MB NEWS:विक्रमी वेळेत ड्रीम रन पूर्ण करून दिला मुक्त जगण्याचा संदेश

 मुंबईतील टाटा मॅरेथॉन मध्ये परळीच्या प्रशांत जोशींचा उत्स्फूर्त सहभाग




विक्रमी वेळेत ड्रीम रन पूर्ण करून दिला मुक्त जगण्याचा संदेश


मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईत दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या टाटा मॅरेथॉन मध्ये परळीचे प्रशांत जोशी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विक्रमी वेळेत ड्रीम रन चा टप्पा पार केला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मूळ ड्रीम रन ही साधारण सहा किलोमीटरची होती, मात्र प्रशांत यांनी ड्रीम रन पूर्ण झाल्यानंतर देखील धावणे सुरूच ठेवत सुमारे 15 किलोमीटर अंतर कापले. परळीतून या स्पर्धेत सहभागी होणारे ते एकमेव परळीकर ठरले!


दि 15 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5 वाजल्यापासून टाटा मॅरेथॉनला सुरुवात झाली, यामध्ये 42 किमी महा मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन, चॅम्पियन डिसेबीलिटी रन अशा विविध प्रकारांचा समावेश होता. मागील काही वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला कोरोना काळात दोन वर्षे ब्रेक लागला होता. 


मात्र कोणत्याही संकटाच्या ब्रेक नंतर पुन्हा मुंबई ज्या जोमाने धावते, त्याच जोमाने या मॅरेथॉन मध्ये 'रन लाईक मुंबई' ही थीम घेऊन विविध वयोगटातील हजारो लोकांनी सहभाग घेतला. 


अभिनेता टायगर श्रॉफ हा टाटा मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अँब्यासिडर आहे, या स्पर्धेत बॉलीवूड सह, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता. 


माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी हे व्यायाम प्रेमी असून, त्यांनी मोठ्या उत्साहात या ड्रीम रन मध्ये सहभाग घेत सुमारे 15 किमी अंतर धावत कापले. 


आयुष्य भरभरून जगता आले पाहिजे, आपल्या धकाधकीच्या जीवनात वेळ काढून आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करता आल्या पाहिजेत. 15 किलोमीटर धावून देखील कोणताही थकवा जाणवला नाही, इतकी या मॅरेथॉन बाबत उत्सुकता माझ्या मनात होती. त्यामुळे आपल्या शरीर संपत्तीला जपण्यासाठी जे जे शक्य ते सर्व करत मुक्त जगले पाहिजे, असा संदेश यानिमित्ताने प्रशांत जोशी यांनी फेसबुक पोस्टच्या मध्यामातून दिला आहे. त्यांच्या या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


त्यांची फेसबुक पोस्ट पुढील प्रमाणे :


#Dream_Run Completed...!


मागील बारा वर्षापासून मुंबईत असलो तरी मुंबईकर म्हणून ज्या अनेक गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या व  अनुभवायच्या राहून गेल्या होत्या, त्यापैकीच एक म्हणजे मुंबईत होणारी प्रतिष्ठेची टाटाची मॅरेथॉन....


मागील बारा वर्षापासून प्रत्येक वर्षी या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा अशी इच्छा होती, मात्र तो योग आला तो यावर्षी! त्याचे कारण म्हणजे शनिवारी आणि रविवारी मुंबईत असणे.....


तसं मला चालणं नवीन नाही; मात्र मॅरेथॉनमध्ये धावणे हा प्रकार मात्र माझ्यासाठी पहिलाच होता.... जमेल का नाही या विचाराने सर्वात छोटी सहा किलोमीटरची ड्रीम रन यासाठी मी निवडली.


ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही मुंबई महापालिकेतील श्री रणजीत  ढाकणे साहेब आणि त्यांचे सहकारी श्री राठोड साहेब यांच्या सहकार्यामुळे नोंदणी करता आली. काल सायंकाळी त्यासाठीचे कीटही मिळाले आणि याच उत्साहात नवीन शूजही विकत घेतले...


यावर्षीची थीम होती #रन_लाईक_मुंबई अगदी तसेच आहे, मुंबई सातत्याने धावत - पळत असते आणि तिची गती तुम्हाला गाठायची असेल तर मुंबईसारखे धावले पाहिजे.


या मॅरेथॉन बद्दल मागील दोन दिवसापासून प्रचंड उत्सुकता असल्याने रात्री झोप येणे शक्यच नव्हते. मी भाग घेतलेली रन आठ वाजता होणार होती आणि त्यासाठी मैदानावर सात वाजता पोहोचायचे असले तरी पहाटे पाच वाजता सुरू होणारी 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन त्यानंतरची 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन मला पहायची होती, त्यासाठी अगदी तीनला उठून कुडकुडत्या थंडीत चार वाजता मी मैदान गाठले...


चारही बाजूने रस्ते बंद असल्याने मैदानापर्यंत पोहोचवण्याचे काम राहुल या मित्राने केले!


अगदी पहाटेपासून संपूर्ण आझाद मैदान गर्दीने फुलून घेतले गेले होते. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष, दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील प्रचंड उत्साहाने या मैदानाकडे येत होती. या गर्दीचा उत्साह पाहूनच आपलाही उत्साह वाढत होता.


सर्व ठिकाणी अतिशय चोख नियोजन, जागोजागी मदत करणारे स्वयंसेवक यामुळे पहिल्यांदाच भाग घेऊनही इथे कोणतीच अडचण आली नाही.


एका मित्राचा प्रवेश पास माझ्याकडे अडकल्यामुळे आणि तो मित्र सीएसटी स्टेशनवर अडकल्याने सकाळीच मुख्य मॅरेथॉन चालू होण्याच्या आधीच आमचा सहा किलोमीटरचा वॉक पूर्ण झाला होता!


प्रचंड उत्साहात वेगवेगळे ग्रुपसमूह अनेक सामाजिक संदेश देत सहभागी झालेले पाहायला मिळाले. सात-आठ किलोमीटरचे अंतर इतक्या सगळ्या उत्साहात कधी पूर्ण झाले ते लक्षातही आले नाही!


तसा या आज असलेल्या मार्गावर माझा रोजच वॉक असतो मात्र आजचा माहोलच वेगळा होता.


पाहणाऱ्या प्रत्येकाला आपणही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेच पाहिजे असे वाटावे इतका उत्साह होता.


आयुष्य हे भरभरून जगता आले पाहिजे.... आपल्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करून घेतल्या पाहिजेत.... प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. असाच एक आनंद आणि एक स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण झाले...


 जवळपास पंधरा किलोमीटर वॉक होऊनही ना कुठला थकवा ना कुठली पाय दुखी.... फक्त आहे ते समाधान.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !