MB NEWS:■ शेतकरी कीर्तन महोत्सवात शेतक-यांची भाकर; जाती-धर्माचा विसर होऊन होतोय ऐक्याचा जागर
■ शेतकरी कीर्तन महोत्सवात शेतक-यांची भाकर; जाती-धर्माचा विसर होऊन होतोय ऐक्याचा जागर
परळी / प्रतिनिधी
चौदा गावातील शेतकरी, कष्टक-यांनी एकत्र येऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त परळी-धारूर सीमेवर असलेल्या कांनापूर येथे होत असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवात
रोजी दुपारी आणि संध्याकाळी होत असलेल्या पंगतीसाठी गावागावातून, घराघरातून एका हाके सरसी भाकरीचा ओघ येऊ लागला आहे. सर्व भाकरी भोजन मंडपात उतरवल्या जातात तेव्हा कार्यकर्ते कौतूकाने त्याकडे पाहू लागले आहेत.गावातील प्रत्येक घराघरातून आलेल्या भाकरींची आता ओळख पुसली गेली असून ती भाकरी कोणत्या घरातून आली, ते घर कोणत्या जातीचं होतं, कोणत्या धर्माचं होतं. हे आता कुणालाच ओळखता येत नव्हतं. या भाकरी कोणत्याही घरातून आलेल्या असल्या तरी शेतक-यांनी पिकवलेल्या धान्याच्या आहेत,ही जाणीव प्रत्येकालाच या नाविन्यपूर्ण व समाज परिवर्तनासाठी क्रांतिकारी ठरत असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवात प्रकर्षाने दिसून येत आहे.
सध्या समाजात कीर्तन सोहळे हे लाखो रुपये खर्च करून एखाद्या इव्हेंट साजरा करावा असे होतात.भली मोठी बिदागी देऊन फक्त मनोरंजन करून आयोजक आपला स्वार्थ साधून घेणारे कीर्तन महोत्सव अनेक होतात मात्र शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कांनापूर येथे होत असलेले शेतकरी कीर्तन महोत्सवात परळी आणि धारूर या तालुक्यातील चौदा गावातील शेतक-यांनी घेतलेला पुढकार एक आदर्श निर्माण करणारा आहे.या शेतकरी कीर्तन महोत्सवात दररोज दुपारी आणि संध्याकाळी शेकडो लोकांच्या पंगती उठत आहेत.या पंगतीसाठी कुठले पंचपक्वान्न कीर्तन स्थळी तयार करण्यात येत नाहीत तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी परळी तालुक्यातील मोहा,गर्देवाडी, करेवाडी,वाघाळा, कावळेवाडी, वंजारवाडी, बोधेगाव, सरफराजपूर तर धारूर तालुक्यातील कांनापूर, म्हतारगाव,आमला, देवठाणा, मुंगी या 14 गावातील प्रत्येक घराघरातुन भाकरी जमा करून ह्या पंगती उठत आहेत.घराघरातून आलेल्या या भाकरी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून शेतात राबवून घेतलेल्या धान्याला त्यांच्या घरातील शेतकरी महिलांनी मायेने तयार करून दिलेल्या या भाकरींनी जसं एक होऊन सर्वांची भूक भागवली, तशीच शेतक-यांची एकजूट व्हावी, असाच संदेशच या भाकरी शेतकरी कीर्तन महोत्सव प्रसंगी देत आहेत.
●●●●●●●●●●●●●●●
शेतकरी ऐक्याचा ध्यास घेऊन कमी खर्चात उच्च प्रतिचे वैचारिक प्रबोधन व्हावे, शेतक-यांची एकजूट व्हावी, या एकजुटीतून शेतक-यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत. सुखी झालेला शेतकरी जगाला सुखाचा घास देईल. सामाजिक समता, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित होईल. त्यातून संतांनी पाहिलेले आनंदी समाजाचे स्वप्न साकार होईल,हा या कीर्तन महोत्सवामागील आशावाद आहे.
-ॲड.अजय बुरांडे
संयोजक,14 गाव शेतकरी कीर्तन महोत्सव ●●●●●●●●●●●●●●●
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा