MB NEWS:जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही

 परळीला भूषण वाटेल असेच काम माझ्या हातून होईल ; तुम्ही साथ द्या, मतदारसंघाची पुन्हा नव्याने बांधणी करू

पंकजाताई मुंडेंच्या हस्ते लोणी, कौठळीत झाले जलजीवन मिशनच्या ६ कोटीच्या कामाचे थाटात भूमिपूजन

सत्ता असताना एक वीटही लावता आली नाही, आता श्रेय घेण्यासाठी मात्र आटापिटा

जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही


परळी वैजनाथ ।दिनांक ०४।

लोकनेते मुंडे साहेबांनी इथल्या लोकांसाठी चाळीस वर्षे खस्ता खाल्ल्या, त्यांना जावून आज नऊ वर्षे झाली पण आजही परळी त्यांच्याच नावानं ओळखली जाते कारण त्यांनी इथल्या लोकांचा सन्मान वाढवण्याचं काम केलं, अगदी तसंच काम माझ्या हातून होईल. माझ्या परळीची मान मी  कधीही खाली जावू देणार नाही असं सांगत आता तुम्हीच मला दत्तक घ्या, तुमच्या साथीने मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधू अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला घातली.

   सत्ता हातात असताना ज्यांना गावच्या विकासाची एक वीटही लावता आली नाही ते आता भाजपच्या सत्तेत आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मात्र पुढे येत आहेत. जनतेच्या विकासाला आणि सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही अशा आक्रमक शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.


   लोणी व कौठळी येथे सहा कोटी रूपये खर्चाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज ग्रामस्थांच्या साक्षीने मोठया थाटात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. लोणी येथे व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप बिडगर, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, रमेश कराड, उत्तमराव माने, जयश्री मुंडे, राजेश गिते, लक्ष्मीकांत कराड, संतोष सोळंके, चंद्रकांत देवकते, बळीराम गडदे, प्रा. वाघमोडे, सरपंच जयश्री भरत सोनवणे, उप सरपंच किश्किंदा प्रल्हाद शिंदे तर कौठळी येथे सरपंच अनिता काटे, उप सरपंच साहेबराव चव्हाण,, पप्पू चव्हाण आदी उपस्थित होते. 


  मतदारसंघातील प्रत्येक गांव विकासानं परिपूर्ण व्हावं हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. पालकमंत्री असताना  त्यासाठी मी अथक प्रयत्न केले. निधी देतांना हात आखडता घेतला नाही की कोणताही पक्ष, जात, धर्म पाहिला नाही, सर्वाना न मागता दिलं तथापि, कुणाकडून अपेक्षाही ठेवली नाही. एवढी कामं केली पण कधी श्रेय घेतलं नाही, हे मात्र माझं चुकलं. देशात आणि राज्यातही भाजपचं सरकार असताना विरोधक मात्र हे सर्व आम्हीच केलं असल्याचा फुकटचा आव आणत आहेत. अडीच तीन वर्षे सत्ता होती, त्यांनी एक तरी काम केलं का? असा सवाल त्यांनी केला. दोन्ही पाणी योजनांचं काम दर्जेदार झालं पाहिजे. लोकांना पाणी देण्यासाठी आपण आहोत, परळीच्या नगरपरिषदे सारखे फक्त खड्डे खोदू नका असं त्यांनी सांगितलं.


*प्रत्येक गाव विकासानं नटवलं*

-----------

पूर्वी आपली सत्ता नसताना दोन तीन लाखाचा निधी मिळायचा पण मी पालकमंत्री झाल्यावर एकेका गावाला कोटी दोन कोटीचा निधी दिला. प्रत्येक गावाला नटवण्याचं काम केलं. गावच्या विकासाचं डिझाईन स्वतः तयार केलं. समान निधी वाटप केला. पीक विमा, अनुदान सर्व काही दिलं. पुन्हा संधी मिळाली असती तर आज चित्र वेगळं असतं असं पंकजाताई म्हणाल्या.


*पिढी बिघडवणारे नेते पाहिजेत की घडवणारे*

------------

आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करण्यासाठी राजकारणात नाहीत. विकासा बरोबरच पिढी घडवणारे, महिलांना सन्मान देणारे नेते पाहिजेत की बिघडवणारे हे तुम्ही ठरवा. राजकारणात चांगल्या माणसाला साथ देणं तुमच काम आहे. मला तुमच्याकडून काही नकोय पण माझ्या परळीचं नाव खराब नाही झालं पाहिजे. तुमची प्रतिष्ठा जपणं, तुम्हाला भूषण वाटेल असेच काम माझ्या हातून होईल असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या.


*वैद्यनाथ कारखाना पुन्हा सुरू होणार ; अफवांवर विश्वास ठेवू नका*

-----------

अफवांवर विश्वास ठेवू नका, वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरू करणार आहे. काही चुकीच्या गोष्टी बंद करून पुन्हा मला तो सुरू करायचा आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचेशी माझी चर्चा झाली आहे, काहीही कमी पडणार नाही असं पंकजाताईंनी कौठळीत बोलतांना सांगितलं.


*क्षणचित्रं*

---------

- लोणी व कौठळी या दोन्ही गावांत पंकजाताई मुंडे यांचं ग्रामस्थांनी वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केलं. गावातील आबाल वृध्द, महिला, पुरूषांनी त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती.


- पंकजाताईंचं ठिक ठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं. 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली, ' अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 


- लोणी येथे पंकजाताईंसोबत लहान मुले मुली देखील पायी चालत होती, त्यांना थकवा येऊ नये म्हणून पंकजाताईंनी सर्वांना स्वतःच्या कारमध्ये बसवले, या प्रसंगाने गावकऱ्यांना त्यांचेतील माय माऊलीचे दर्शन झाले.


- बेलंबा येथे राजेश गिते,किशोर गिते व ग्रामस्थांनी पंकजाताईंचा जेसीबीने फुलांची उधळण करत  भला मोठा पुष्पहार घालून मोठया जल्लोषात जोरदार स्वागत केले.


- जलजीवनच्या माध्यमातून पंकजाताई पुन्हा एकदा विकासाची गंगा घेऊन परत आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये  दिसून आली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार