मुख्य सामग्रीवर वगळा

MB NEWS:♦️पत्रकार श्रीराम लांडगे लिखित अभिष्टचिंतन लेख...♦️ मनातील भावविश्वाचा अचुक रेशीम बंध गुंफणारे मार्गदर्शक प्रा. रवि सर...!

  ♦️ मनातील भावविश्वाचा अचुक रेशीम बंध गुंफणारे मार्गदर्शक प्रा. रवि सर...!

  • ♦️ परळीच्या पत्रकारितेतील कोहिनूर ...!   

 तस पहायला गेलं तर बीड जिल्हा म्हणजे निडर, अभ्यासू, जिज्ञासु व नाविन्याचा शोध घेणाऱ्या पत्रकारांची जणू खानच आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यातच सर्वाधिक वर्तमानपत्र व दैनिक चालवली जातात प्रकाशित होतात. आपसुकच यामुळे एकूणच येथील पत्रकारिता क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असून या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांचा कल वाढलेला आहे. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या बहुतांश नवोदितांना  याठिकाणी व्यासपीठ देखील उपलब्ध होते. पत्रकारिता क्षेत्र एका मृगजळासारखे असून बाहेरून पाहणार्‍याला त्याची झळाळी व चकाकी जाणवल्याशिवाय राहत नाही. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आदीं बाबी वरती बीड जिल्ह्यातील पत्रकार अभ्यासपूर्ण भाष्य करत असतात व तेवढी समग्र प्रतिभा देखील येथील पत्रकारांमध्ये असल्याचे जाणकारामधून बोलले जाते...

      आज अशाच एका परळी तालुका व बीड जिल्हाच नव्हे तर आपल्या पत्रकारितेच्या जोरावरती सबंध महाराष्ट्रामध्ये सामान्य व वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपली लेखणी झिजवनाऱ्या व वृत्तपत्रीय क्षेत्रातील सर्वच पैलूंचा सखोल अभ्यास असणाऱ्या राजकारण, साहित्य, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात लेखनाच्या माध्यमातून  मुशाफिरी करणाऱ्या प्रतिभावंत, प्रतिभासंपन्न असणाऱ्या ज्यांना की माझ्या मते पत्रकारितेतील कोहिनूर म्हटले तरी अतिशयोक्तीचे अथवा वावगे ठरणार नाही अशा व्यक्तिमत्त्वाचा परिचय देण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्प बुद्धीने करणार आहे.....!

प्रा. रवींद्र जोशी सर..... हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर काळ आणी वेळ उभा राहतो तो 2002 सालचा त्यावेळी मी नुकताच परळी वैजनाथ या ठिकाणी राहायला आलो होतो.  ... आणि रवी सरांची पत्रकारिता नुकतीच  भरात येत होती ... त्या काळी मी  वृत्तपत्र टाकण्याचे काम करत असायचो. याच कामामुळे रवी सरांची आणि माझी पहिली भेट दैनिक वैद्यनाथ टाइम्सच्या स्टेशन रोड स्थित कार्यालयामध्ये झाली. पहिल्याच भेटीत सरांनी आपला हजरबाबी स्वभाव व लहान थोर प्रत्येकाविषयी असणारी आत्मीयता, आपुलकीची भावना यामुळे लागलीच आपलेसे केले ... परळीतील अग्रगण्य दैनिक असणाऱ्या वैद्यनाथ टाइम्स या ठिकाणी रवी सर पत्रकारिता करायचे. भले हि रवी सरांच्या पत्रकारीतेचा श्रीगणेशा शिवशंकर झाडे यांच्या क्रांती संघर्ष मध्ये झाला असला तरी त्यांची खरी पत्रकारिता वैद्यनाथ टाइम्स या परळीतील त्याकाळच्या अग्रगण्य दैनिकामध्ये बहरली व त्यांच्या त्यांच्या पत्रकारितेला तेथेच उत्कर्ष प्राप्त झाला असे मला तरी वाटते. तदनंतर रवी सरांनी दैनिक गावकरी, परळीचे मुखपत्र असलेले दैनिक मराठवाडा साथी,  आदी दैनिकांसह जिल्हा व विभागीय स्तरावरील विविध नावाजलेल्या दैनिकामध्ये आपल्या सजग तथा परिणामकारक पत्रकारितेची मोहर उमटवली. आजच्या महाराष्ट्रातील अग्रगण्य तथा प्रमुख दैनिक असलेल्या पुढारी व  आजच्या घडीला नवतंत्रज्ञानाची कास धरत नेहमीच वेगवेगळे कन्टेन्ट देत डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वतः संपादक असलेल्या एम. बी. न्यूज व एम. बी. न्यूज चॅनेल पर्यंतचा पत्रकारितेतील रवी सरांचा  उल्लेखनीय प्रवास आजतागायत सुरूच आहे  ...

         पत्रकारितेतील अतिशय खडतर प्रवास करत अनेकांना मार्गदर्शन करत वृत्तपत्रीय क्षेत्रात अनेकांना खंबिरपणे उभे करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. रवी सरांनी पत्रकारितेच्या हा परमोच्च बिंदू गाठण्यासाठी केलेला अतिशय खडतर प्रवास मी जवळून अनुभवला आहे. केवळ आणि केवळ पत्रकारितेच्या आवडी खातिर त्यावेळी दळणवळणाची अतिरीक्त साधन उपलब्ध नसतानादेखील त्यांनी आपले मूळ  गाव म्हणजे उखळी बुद्रुक या ठिकाणावरून उखळी ते परळी असा दररोजचा साधारणत: तीस किलोमीटरचा प्रवास सायकल वरती करायचा. याचे कारण म्हणजे सरांच्या नसानसात भीणलेली पत्रकारिता. एवढा प्रवास सायकल वरती करून देखील त्यांचा चेहरा नेहमीच प्रफुल्लित व आनंददायी असायचा त्याचे एकमेव कारण म्हणजे ते त्यांच्या आवडीचे कार्यक्षेत्र हे होय. त्याकाळी देखील त्यांची अभ्यास पूर्ण, सजग, परिणाम कारक, समग्र, सर्वंकष तथा बातमीचे विविधांगी विश्लेषण करणारी पत्रकारिता माझ्यासारख्या नवख्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक तर आहेच परंतु अनेक लेखणी सम्राटांना व धुरिणांना देखिल मी रवी सरांकडून बातमीतील बारकावे जाणून, समजून, ऊमजून घेताना पाहिले आहे. रवी सरांचे व्यक्तिमत्व अतिशय मृदू जरी असले तरी काही प्रसंगी ते कठोर भूमिका स्वीकारतात त्यांना अन्यायाबद्दल प्रचंड चीड व सनक असून जिथे कुठे कुणाचे चुकले अथवा एखाद्या वरती विनाकारण अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी रवींद्र जोशी सर कोणाचाही मुलाहिजा न राहता कठोरपणे व्यक्त होताना देखील मी अनुभवले आहेत ... मग समोरचा कितीही मोठा असो त्याची गय केली जात नाही ... कोणी जर का चुकीचे वागत असेल किंवा चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत असेल तर त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला रवी सर यत्किंचितही भिक न घालता ते कठोरपणे व्यक्त होतात ...  चुकीला चूक म्हणण्याचे धारिष्ट्य आणि सामर्थ्य ते नेहमीच ठेवत असतात.

    परळीतील पत्रकारितेचा परीघ रवी भाऊंच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे मला तरी मनोमन वाटते.....विभागीय स्तरावर पत्रकारितेच्या क्षितिजावरती तेजोमय चमकणाऱ्या व आपल्या कार्यशैलीच्या जोरावर निडर बाणा जपनाऱ्या तसेच या क्षेत्रातील धडाडीचे नाव असलेल्या रवी दादा यांच्या कडे पत्रकारितेतील जवळपास दोन तपाचा अनुभव असून गेल्या अनेक वर्षांपासून ते आपली लेखणी समाजातील विवीध प्रश्नासाठी झिजवत आहेत.  पत्रकारितेतील ग्लॅमर, मिळणारा मानसन्मान, प्रसिद्धी आणि त्याला जोडून येणारा अहंभाव त्यामुळे अनेक जणच नव्हे तर आजच्या काळातील कॉपी-पेस्ट बहाद्दर देखील हवेत असतात. परंतु रविंद्र जोशी सर याला कायम अपवाद राहिले आहेत. पत्रकारिते सोबतच ते एक उत्तम निवेदक देखील असून पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वच क्षेत्रांमध्ये  मित्रांचा गोतावळा जमवला आहे. बीड जिल्ह्यात नव्हे तर सबंध मराठवाड्यामध्ये त्यांनी आपली जिज्ञासू वृत्ती नवीन काहीतरी शोधण्याचा व देण्याचा प्रयत्न व लेखणी सामर्थ्याच्या जोरावरती आपल्या कार्य व कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळी अशी छबी निर्माण केली असून पत्रकारितेतील विभागीय स्तरावरील मान्यवर नेहमीच त्यांचा अभिप्राय मागवून घेतात. पत्रकारितेमध्ये वेगवेगळे तथा नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा नेहमीच माणस असतो. त्यांचे विविध विषयावरील लेख, अग्रलेख, व्यक्तिविशेष, मुलाखती विशेष वार्तांकन व सर्वंकष लेखन अतिशय प्रभावी व वास्तवदर्शी असते. त्यांचे समाजप्रबोधनपर लेखनही नेहमीच पत्रकारितेतील धुरीणांचे व सामान्य जनांचे दाद मिळवणारी ठरलेले आहे.

 

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ...शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ...शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ... शब्द वाटू धन जन लोक ... जगद्गुरु तुकोबारायांच्या या उक्तीप्रमाणे पत्रकारिता ज्यांच्या नखशिखांत भिनलेली आहे अशा निर्भिड, प्रतिभासंपन्न, प्रतिभावंत,  विविध क्षेत्रामध्ये आपल्या ज्ञान कौशल्याच्या सामर्थ्यावर मुक्त संचार करणारे अवलिया, हाडाचे पत्रकार अशा कितीही विशेषनाची आभूषणे त्यांना लावली तरीही ती कमीच पडतील ... विशेषनांच्या चौकटीमध्ये न मावणाऱ्या पत्रकारितेतील या परिसासम व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त रवी सरांना मनःपूर्वक शुभेच्छा  ... आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रा. रविंद्र जोशी सरांना आरोग्यदायी, दीर्घायु आयुष्य लाभो एवढीच वैद्यनाथांच्या चरणी मनस्वी प्रार्थना .....🙏

    ♦️ शब्दांकन...

        श्रीराम लांडगे

     पत्रकार परळी वैजनाथ.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला