धनंजय मुंडे यांनी परळीतील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट
जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेत जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणारच - मुंडेंचा आंदोलकांना शब्द
परळी वैद्यनाथ (दि. 4) - मागील राज्य सरकारच्या काळात आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात संवैधानिक बाबींमध्ये निर्माण झालेल्या पेचामुळे टिकू शकला नाही, मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच विचारांचे हे सरकार आहे; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून व्यापक प्रयत्न करू, सरकारही सरकारची जबाबदारी 100% पार पाडेल, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली - सराटी येथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन स्थळी झालेल्या अप्रिय घटनेनंतर परळी वैद्यनाथ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनास आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
जालना जिल्ह्यातील अंतरवली - सराटी येथे आरक्षणाची मागणी करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांवर पोलिसांमार्फत झालेल्या लाठीचार्जची घटना ही निषेधार्ह असून राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील या घटनेचा निषेध केलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच तोपर्यंत संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. चौकशी अंती या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी आंदोलकांशी चर्चा करताना दिली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अनेक सदस्य, विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा