ज्ञानोबा सुरवसे यांचा प्रासंगिक विशेष ब्लॉग:जिएसटीच्या मागचा शिखंडी कोण...?


जिएसटीच्या मागचा शिखंडी कोण...?

वैद्यनाथ वाचवण्यासाठी वर्गणीची चळवळ


      एखादा योध्दा शरण येत नसेल तर त्याला बदनाम केले जाते किंवा एखाद्याला संपवण्यासाठी षडयंत्र रचले जाते हा इतिहास आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचे किंवा कोणतीही पातळी गाठण्याचे आजही प्रकार सुरू आहेत. पण अशा प्रकारालाही पुरून उरणारा किंवा षडयंत्रांवर मात करून उभे राहणारे असतेच. अनेक क्लृप्ती करूनही जो हरत नाही... डरत नाही... किंवा डगमगतही नाही असे एक व्यक्तीमत्व आहे आणि ते म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजाताई मुंडे... खरं तर त्यांना नामोहरम करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. पण जनता - जनार्दनाचा मोठा आधार, आशिर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने एकाही प्रयत्नाला यश आले नाही. सत्तेत असतानाही त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक अकांडतांडव माजविण्याचा प्रयत्न केला. अखेर निष्पन्न काही झाले नाही आणि खुद्द न्यायालयानेच क्लीन चिट दिली. त्यामुळे आरोप करणारे आणि करायला लावणारे दोघेही तोंडघशी पडले. सार्वजनिक जीवनात अतिशय पारदर्शक काम करणाऱ्या आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जाणार्‍या पंकजाताई मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांची "दुखरी नस" असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यालाच आता लक्ष बनवण्यात आले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वैद्यनाथची उभारणी केली. अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जपले ते नेहमी "वैद्यनाथ हे माझे चौथे अपत्य आहे" असे म्हणायचे. पत्रकारांनाही ते नेहमी "माझ्या विरोधात काय लिहायचे ते लिहा पण "वैद्यनाथ" काही नाव ठेवू नका" असे जाहीरपणे सांगत. मुंडे साहेबांनी वैद्यनाथचा नावलौकिक एवढा वाढवला की आशिया खंडात डंका वाजला. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित कारखान्यांना वैद्यनाथच्या यशाचे गमक जाणुन घेण्याची उत्सुकता वाटू लागली. खुद्द शरद पवार यांनाही वैद्यनाथचे अप्रुप वाटू लागले. परंतु मुंडे साहेबांनंतर मराठवाड्याच्याच मागे दुष्काळाचा फेरा लागला. पाऊस कमी झाल्याने ऊसाचे उत्पादन घटले आणि साखर निर्मितीचा खर्च वाढला. पंकजाताई मुंडे यांनी आर्थिक संकटावर मात करण्यासाठी वैयक्तिक खर्च केला. इतर कारखानदार कारखान्याचा पैसा वापरत असतात मात्र एकमेव पंकजाताई मुंडे या अशा कारखानदार आहेत ज्यांनी स्वतःचा पैसा कारखान्यासाठी वापरला. वैयक्तीक झळ सहन केली. आता तर कारखाना आर्थिक संकटात आहेच पण ज्यांनी सहकार्य करणे अपेक्षित होते त्यांनी हात आखडता घेतला नव्हे असहकाराची भूमिका घेतली. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. विरोधकांच्या कारखान्यांना सढळ हाताने मदत केली मात्र वैद्यनाथला मदत झाली नाही. पंकजाताई स्वतः कारखानदारांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेल्या, इतरांना मदत मिळाली पण वैद्यनाथला काहीच सहकार्य मिळाले नाही किंवा सहकार्य मिळू नये यासाठी काहींनी वजन वापरले. बँकांचीही मदत होणार नाही याची फिल्डिंग लावली. एवढे होऊनही पंकजाताई डगमगत नाहीत म्हणुन शेवटी आता जिएसटीचा हत्यार म्हणून वापर सुरू केला आहे. वास्तविक महाभारतातील युध्दामध्ये पितामह भीष्माचार्य यांना पराभूत करण्यासाठी महान धनुर्धर अर्जुनाला शिखंडीच्या पाठिमागे थांबून बाण सोडावा लागला होता. आताही एका योद्ध्याला नामोहरम करण्यासाठी शिखंडीचाच वापर होतोय फक्त शिखंडी स्वतः जिएसटी च्या पाठीमागे आहे फरक एवढाच! अर्थात इथे योद्ध्याच्या पुढे ढाल बणुन तमाम जनता उभी राहिली असल्याने हे शिखंडीचे "जिएसटी अस्त्र" केवळ निष्प्रभ ठरले नाही तर आता ते बुमरँग होऊन शिखंडीवरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकोणीस कोटी रुपये जिएसटी थकवली म्हणुन वैद्यनाथवर कारवाई करायला निघालेल्या विभागाला थेट जनतेनेच उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. जिएसटी अस्त्रावर जनतेचे" वर्गणीचे ब्रम्हास्त्र" प्रभावी ठरण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे. एकोणीस कोटी रुपये जिएसटी विभागाच्या तोंडावर मारण्यासाठी राज्यातील असंख्य नागरीक सरसावले आहेत. एवढेच नव्हे तर केवळ ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्य़ातील कासेवाडीकरांनी एकाच दिवशी तब्बल सात लाख रुपये वर्गणी जमा केली आहे. अशा लोकवर्गणीतुन किती पैसा जमा होईल? हा विषय वेगळा परंतु ज्या जनभावना आहेत त्या लाखमोलाच्या आहेत. अर्थात या भावनांची संबधितांनी दखल घेतली तर सरकारला भावनांची कदर आहे हा संदेश तरी लोकांमध्ये जाईल.

- ज्ञानोबा सुरवसे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार