गोपीनाथगडावर पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने उपस्थितांचे ह्रदय सद्गदित !

 गोपीनाथगडावर पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने  उपस्थितांचे ह्रदय सद्गदित !


गोपीनाथराव मुंडे तुमचा आमचा स्वाभिमान: त्यांचे विचार व संस्कार शतायुषी करण्याचा संकल्प करूया


संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केला खंबीर विश्वास


परळी वैजनाथ ।दिनांक १२।

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे हा तुमचा- माझा -आपल्या सर्वांचा स्वाभिमान असून त्यांचे संस्कार व विचार हे शतायुषी करण्याचा संकल्प आज आपण करूया. गावागावापर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत मुंडे साहेबांचे विचार पोहोचविण्याचा हा संकल्प आहे.  मुंडे साहेबांनी दिलेला संस्कार- संघर्ष -स्थैर्य -स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचार सूत्रावर वाटचाल करताना आपले आयुष्य जनतेसाठी समर्पित आहे.यासाठी स्वतःचे काहीही होवो परंतु या मार्गावर वाटचाल करताना कधीही डगमगणार नसल्याचा खंबीर विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथगडावर बोलताना व्यक्त केला.

     लोकनेते मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावात गोपीनाथगड गेल्याचे चित्र बघायला मिळाले.  या अनुषंगाने आज १२ डिसेंबर रोजी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगडावर हजारो मुंडे समर्थकांनी येऊन समाधीचे दर्शन घेतले.  त्यानंतर गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी  उपस्थितांशी व महाराष्ट्रभरातील मुंडेभक्तांशी संवाद साधला. यावेळी मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

        यावेळी बोलताना  पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आजचा गोपीनाथगडावरील कार्यक्रम हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. मी आवाहन केल्यानंतर गावागावात गोपीनाथगड निर्माण झाला असून प्रत्येक ठिकाणी समाजाप्रती समर्पित व सेवाभावाने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हा तुमचा आमचा सर्वांचा स्वाभिमान असून मुंडे साहेबांचे संस्कार व विचार हे शतायुषी झाले पाहिजे यासाठी आपण संकल्प करूया. 


उपस्थितांचे ह्रदय सद्गदित

----------

आपल्या पित्याच्या स्मृतीने काहीशा भावूक झालेल्या या कन्येने मुंडे साहेबांच्या आठवणी  सांगताना उपस्थित प्रत्येकाचे ह्रदय सद्गदित झाले. पंकजाताईंनी सांगितले की, मुंडे साहेब हे सर्वसामान्य घरातून जन्माला आलेले पण राजा मनाचे राजासारखे व्यक्तिमत्व होते. या राजाच्या पोटी आपला जन्म झाला याचा आपल्याला अभिमान आहे.  आपल्याला वेळोवेळी राजकीय वाटचाल करताना जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा तेव्हा आपण गोपीनाथगडावर येतो आणि नक्कीच मार्ग सापडतो. स्वर्गीय मुंडे साहेबांचे विचार व संस्कार ही आपली शिदोरी असून या संस्कारातूनच प्रत्येकाबाबतीत मातेसमान ममत्व आपल्यामध्ये निर्माण झाले आहे. मुंडे साहेबांना माझ्यात बघत असताना सारेजण मला लेकरं वाटतात आणि लेकरांची काळजी घ्यावी त्याप्रमाणे प्रत्येकाच्या सुखदुःखाची जाणीव नेहमी मला असते. ज्याप्रमाणे माझी ही भावना तुमच्याप्रती आहे त्याचप्रमाणे तुम्हीही लेकराप्रमाणे मला जपता. अशी एकमेकाबद्दलची ममत्व भावना असणारे जगात दुसरे कोणते नाते नसेल हे भाग्य मला लाभलेले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे संस्कार- विचार -स्थैर्य- स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसूत्रावर वाटचाल करताना स्वतःच्या जीवनाचा विचार न करता आयुष्य जनतेसाठी समर्पित केले आहे. मुंडे साहेबांच्या या विचारसुत्रावर वाटचाल करताना आपण कधीही डगमगणार नाही. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशा प्रकारचा खंबीर विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


मुंडे साहेबांवरील कावितेचं प्रकटवाचन....

------------

दरम्यान यावेळी पंकजाताई मुंडे यांनी प्रा. अशोक मिरगे यांनी लिहिलेल्या मुंडे साहेबांवरील कवितेचे प्रकट वाचन केले. या कवितेतील प्रत्येक शब्द न शब्द आपल्या हृदयातील असून मुंडे साहेबांच्या जयंती निमित्ताने आपल्या सर्व भावना या कवितेतून आल्याचे त्या म्हणाल्या. ही कविता वाचताना पंकजाताईनी आपल्या शब्दरूपी भावना व्यक्त केल्या. 

      *"लक्ष लक्ष आशीर्वाद घेऊन तुमच्या प्रतिमेचे पूजन करते ,आज जयंतीदिनी बाबा मी तुम्हाला वंदन करते*

          *भविष्यात काय होईल माहित नाही पण वाईट काहीच घडणार नाही, कसोटीच्या काळात तुमची पंकजा कुठेच कमी पडणार नाही*

       *परळी मध्ये येताना आणि जातानाही मन सैरभैर होतं, मुद्दाम गोपीनाथगडावर येऊन आधी तुमचं दर्शन घेतं*

         *बाबा कुठे आहात तुम्ही स्वतःची काळजी घेत जा, वेळ काढून कधीतरी आपल्या पंकूकडे आशीर्वाद रूपाने येत जा* 

       *उपेक्षेचा, संघर्षाचा एक एक प्रसंग या पाच वर्षात जगत गेले, प्रत्येक वेळी बाबा मी माझ्यात तुम्हाला बघत गेले* 

         *भरभरून जनतेची सेवा केली मागे पाहून कधी दमले नाही, पोटात एक अन् ओठात एक बाबा मला कधी जमले नाही*

      *बाबा आज तुमच्या जयंतीला एक एक प्रसंग आठवत आहे , आभाळाएवढं तुमचं कर्तृत्व पंकजा हृदयात साठवत आहे* 

         *माझं भाषण असो की दौरा मी एकटीनं कधीच केला नाही, तुम्ही सोबत नाही असा एकही दिवस माझा गेला नाही*

             *जणू तुम्ही ठरवलंच होतं आता मला जायचं आहे, भोवतीच्या जगापासून वेगळं व्हायचं आहे*

            *सगळ्यांची माया तोडून असे अचानक निघून गेलात, सत्ता असो किंवा नसो तुम्ही राजासारखं जगून गेलात "*

•••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !