प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंत्यसंस्कार

 अंत्यविधी करायचा कोठे ? ; मृतदेह ग्रामपंचायसमोर ठेवून नातेवाईकांचा चार तास ठिय्या 


 प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंत्यसंस्कार


गेवराई : प्रतिनिधी....

    गेवराई तालुक्यातील सुशी (वडगाव) गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. गुरूवारी एका ६० वर्षीय भूमीहीन व्यक्तीचे ह्दयविकाराने निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कोठे करायचे, म्हणत नातेवाईक व ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर सदरील मयत व्यक्तीचा मृतदेह ठेवून ठिय्या मांडला. यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. तब्बल चार तासानंतर या अधिकाऱ्यांनी गावालगत असलेल्या गावठाणची जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


    गेवराई तालुक्यातील सुशी (वडगांव) येथे स्मशानभूमी नाही. त्यातच गावालगत गावठाण जागा असताना देखील गावातील काही जणांकडून विरोध होत असल्याने अंत्यविधीसाठी नातेवाईकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान गुरूवारी या गावातील तुळशीराम आश्रुबा कनेढोण या व्यक्तीचा ह्दयविकाराने मृत्यु झाला. मयत कनेढोण हे भूमीहीन असल्याने अंत्यविधीसाठी जागा नाही. गावालगत शासनाची गावठाण जमीन असताना गावातील काही लोकांच्या विरोधामुळे याठिकाणी अंत्यसंस्कार करता येईनात म्हणून अंत्यसंस्कार करायचा कोठे ? असा प्रश्न नातेवाईक व ग्रामस्थांना पडला. त्यामुळे मयत तुळशीराम कनेढोण यांचा मृतदेह थेट गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मांडण्यात आला, यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच नायब तहसीलदार एस.बी.कुटे, मंडळ अधिकारी व्ही.व्ही. अंमलेकर, तलाठी बी.एस.सोन्नर, ग्रामसेवक राजेंद्र बन, विस्तार अधिकारी एस.बी.गायकवाड, आर.बी.उनवणे तसेच गेवराई पोलिस यांनी गावात धाव घेऊन तेथील नातेवाईकांशी चर्चा केली. यानंतर या प्रशासकीय अधिकारी यांनी गावालगत असलेल्या गावठाण जमीनीवर जागा उपलब्ध करुन दिली, तसेच या जागेवर स्मशानभूमी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. 


गावठाण जागा उपलब्ध असताना स्मशानभूमी नाही

    सुशी गावालगत शासनाची गावठाण जमीन आहे. या जागेवर स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी माझ्यासह काही ग्रामस्थांनी आंदोलन देखील केले. मात्र गावातील काही लोकांचा याठिकाणी स्मशानभूमी करण्यास विरोध होत असल्याने गावात कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करायचे कोठे हा प्रश्न निर्माण होत आहे. तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज लेखी आश्वासन दिल्यानुसार तात्काळ स्मशानभूमी करण्यात यावी.

   - बदाम पौळ

ग्रामपंचायत सदस्य, सुशी (वडगाव)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार