प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>>समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा गायकवाड

 समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा  गायकवाड


२६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वीकृत केलेला मंगलमय दिन!याच दिवसाचा आणखी एक विलक्षण योग म्हणजे  समाजप्रबोधनकार साहित्यिक संपादक रानबा गायकवाड यांचा जन्मदिवस.सर्वप्रथम त्यांना जन्मोत्सव निमित्ताने सम्यक मंगलकामना!

विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपण लेखणी हाती घेतली .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावलांनी पुनीत झालेल्या  रयत शिक्षण संस्था सातारा परिसरात  आपल्या आयुष्याची बांधणी केली.आपण पत्रकारिता क्षेत्राला जरी सेवा दिली असली तरी आपण आपल्यातील साहित्यिक-रंगकर्मी सतत जागा ठेवला. अनेक नाटकांमध्ये आपण अभिनय करुन आपल्यातल्या नटाची साक्ष दिली अनेक नाटकांचे अत्यंत सकस आणि अर्थपूर्ण असे नाटयलेखनही केले आहे.

आपल्या सशक्त लेखणीतून साकारलेली आणि प्रतिभावंत  सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेली 'भीमयुग' ही नाट्यकृती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा नाट्याविष्कार  होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाचा यथार्थ गौरव करणारी नाट्यकृती म्हणून भीमयुग हे नाटक आंबेडकरी चळवळीला दिशादर्शक ठरत आहे. रंगभूमी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी-प्रेक्षकांनी आपल्या भीमयुग नाट्यकृतीचा सन्मान केला आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत ,खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे महान कार्य  आपण करीत आहात. बुद्ध-शिवराय- फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार नाटकाच्या माध्यमातून  आपण जनमानसात रुजवीत आहात. आपल्या कविता-कथांनी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे.

शिक्षकांसाठी शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करणारे आपण खरे 'लोक शिक्षक'आहात.फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत आपले महत्वपूर्ण योगदान आहे.

रंगभूमी बरोबरच आपण चित्रपट क्षेत्रही तेवढयाच ताकदीने हाताळले आहे. आपण लेखन केलेले पाण्याखालचं पाणी, राधा, फायनल तिकीट, माईंड ईट इत्यादी अनेक लघुचित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकारी ठरलेले  आहेत.मनोज कदम,अमृत मराठे  निर्मित डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित तसेच डॉ. सिद्धार्थ तायडे सहदिग्दर्शित आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त 'ग्लोबल आडगाव' या  सिनेमात  आपण महत्वपूर्ण भूमिका साकारलीआहे. अनेक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांशी आपला निकटचा संबंध राहिलेला आहे. आपल्या कर्तव्याची दखल घेऊन अनेक सन्मान आपणाकडे चालून आले. आपण साहित्य-कला-सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रांत भरीव योगदान देत आहात.

वंचित आणि शोषितांचा आवाज हा आपल्या लेखनीचे आणि लघुचित्रपट  क्षेत्राच्या प्रवासाचे सामर्थ्य राहिलेले आहे. आपण, बाबासाहेबांची जीवनदृष्टी अंगीकारुन जी

वाटचाल केली आहे. त्याचा आम्हाला  सार्थ अभिमान वाटतो!  परळी सिने-नाटय कलावंत संघटना, सम्यक थिएटर्स,अ. भा.नाटय परिषद, शाखा परळी,रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई,सूर्यप्रकाश फाउंडेशन परळी वैजनाथ  तक्षशिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था, परळी वै. आणि तमाम रंगकर्मी व समस्त परळीकर  नागरिकांच्या वतीने"भीमयुगकार" या पदवीने आपण सन्मानित आहात. याचा आम्हाला अत्यानंद व सार्थ अभिमान आहे.!

आमचे मार्गदर्शक,जेष्ठ साहित्यीक-संपादक आयु. रानबा गायकवाड साहेब,

म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्व...! 

एक प्रकारचा सच्चेपणा,पारदर्शीपणा त्यांच्या लेखनाला आणि जगण्याला आहे. संवेदनशीलता हाच त्यांच्या सर्जन आणि सृजनाचा अविभाज्य भाग आहे. याच संवेदनेतून ते रसिक प्रेक्षकांना नवी दृष्टी देतात. अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांना प्राप्त आहेत; पण व्यक्ती म्हणून त्याचा अभिनिवेश त्यांच्यात कुठेच नाही.त्यांनी "भीमयुग" या क्रांतिकारी नाटकातून  भारतीय संविधानाचा यथार्थ गौरव केला आहे. "झेड पीचे सर अन कामं ढीगभर" या नाटकातून राष्ट्राचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांची व्यथा मांडली आहे."फोटोसेशन"या नाटकातून दिखाऊ पणावर व्यंगात्म प्रहार करून आजचे राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक वास्तव उलगडून सांगितले आहे."क्रांती सूर्याच्या दिशेने"या परिवर्तनवादी काव्यसंग्रहातून वर्तमानाचे भान दिले आहे.पाण्याखालचं पाणी ,राधा, फायनल तिकीट,माईंड ईट या लघुपटातून  भवितव्यातील संकेत दिले आहेत. 'कुत्र्याची अंडी' या कथासंग्रहातून सामाजिक दांभिकपणावर प्रहार केला आहे.काळाच्या पुढे पाहणारा,कवी, नाटककार,पटकथाकार, अभिनेता..निर्भीड संपादक- पत्रकार,अभ्यासू वक्ता,संवेदनशील कार्यकर्ता,दिलदार,प्रांजळ व निरागस मित्र म्हणून रानबाजी गायकवाड सर्वप्रिय आहेत..

आजकालच्या वातावरणात बोलणे आणि त्यातल्या त्यात सत्य बोलणे अवघड झालेले असताना  ते धाडस रानबा गायकवाड यांचे सारखे निर्भीड साहित्यिक-संपादक  करत आहेत. या धाडसाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज जे जे सत्य बोलण्याची किंमत मोजायला तयार आहेत, जे लोकशाही मूल्ये जपण्यासाठी, न्यायासाठी, समतेच्या रक्षणासाठी जे लेखक, विचारवंत, साहित्यिक ,संपादक कार्यरत आहेत त्यांच्या श्रेणीतील अग्रणी नाव अर्थातच रानबा गायकवाड साहेब.

साहित्य, पत्रकारिता ,कविता,नाटक, सिनेमा आणि माणसांत रमणारा सच्चा" माणूस" म्हणून आम्हांला रानबाजींचा नितांत आदर आहे...!

समाजप्रबोधनकार 

भीमयुगकार रानबा गायकवाड  यांना भावी कलात्मक 

सृजनशील जीवनप्रवासास मंगलमय सदिच्छा!

आपला स्नेहांकीत;

✍🏻 डॉ. सिद्धार्थ तायडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार