अभिष्टचिंतन: ✍️ सुधीर सांगळे यांचा विशेष लेख >>>>>एक वाल्मिक अण्णा सोबतीला हवाच!

 एक वाल्मिक अण्णा सोबतीला हवाच!




वाल्मिक बाबुराव कराड अर्थात सर्वांचे लाडके वाल्मिक अण्णा या नावाची बीड जिल्ह्याला आणि मुंबईच्या मंत्रालयाला वेगळी ओळख सांगायची गरज नाही! राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते अगदी पूर्वाश्रयीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनाही आपल्या उत्कृष्ट नियोजनाची भुरळ पाडणारे वाल्मिक अण्णा, असा एक कार्यकर्ता प्रत्येक मोठ्या नेत्यांसोबत असावा, अशी इच्छा वरील पैकी सर्वांनिच बोलून दाखवली. इतकेच नाही तर काही बड्या नेत्यांनी तर चक्क धनुभाऊंना तुमचे वाल्मिक अण्णा आम्हाला द्या, अशी जाहीर मागणीच केली! या गोष्टी सहज घडत नसतात, त्यामागे अपार कष्ट, मेहनत, वेगवेगळा सोसलेला त्रास, अनेकांचे काढलेले रुसवे फुगवे, त्याग, समर्पण अशा विशेषणांची एक मालिकाच असते. 


वाल्मिक अण्णा एखाद्या नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल असे सुरेख व अद्वितीय नियोजन सभा-कार्यक्रमांचे करतात. एखादा कार्यक्रम त्यांनी मनावर घेतला तो असा घडतो, की तसा कार्यक्रम पुन्हा होणे नाही, त्यापुढच्या कार्यक्रमात ते मागच्या कार्यक्रमाचा विक्रम मोडीत काढतात, हा आजवरचा इतिहास आहे आणि हा इतिहास सबंध बीड जिल्ह्यासह आता राज्यातील अनेक बड्या नेत्यांना माहीत झाला आहे. 


कुठल्याही सभेच्या किंवा कार्यक्रमाच्या नियोजनातील इतके बारकावे अण्णांना तोंडपाठ आहेत, की चांगला जाणकार सुद्धा बऱ्याचदा अवाक होतो! काही दिवसांपूर्वी परळीत सीएम व दोन्ही डिसीएम यांच्या उपस्थितीत जो शासन आपल्या दारी झाला, त्यातला एक किस्सा... एकतर 40 मिनिटांच्या दिव्य रॅलीचे नियोजन होते, मात्र ऐनवेळी रॅली रद्द झाली. पण गाडीतून उतरून मंडपात जाण्याचा जो दहा मिनिटांचा रस्ता होता, अण्णांनी सर्व रॅलीचे नियोजन त्या दहा मिनिटांच्या रस्त्यातच केले, आणि रॅलीच यशस्वी केली. त्यावेळी एक डीजे वेगवेगळी गाणी वाजवत होता. विशेष म्हणजे अण्णांनी स्वतः काही पार्श्वगायकांना बोलून त्या कार्यक्रमपूरते काही खास गाणे बनवून घेतले होते. डीजेने लावलेल्या गाण्यात गाणे नवीन असल्याने योग्य स्वर येत नव्हता. अचानक अण्णा डीजेच्या गाडीवर चढले आणि डीजेला सूचना देऊ लागले. काही क्षण डीजेला वाटले असेल की हा माणूस मला, एका डीजेला साऊंड मॅनेजमेंट काय शिकवणार? पण अण्णा बोलले अन कमालच झाली! अण्णांनी चक्क डीजेला घुंगरू, बास, ट्रीबल इत्यादी कोणत्या बाबी किती डेसीबल आवाजावर सेट करायच्या, त्याच्या नोट्स तोंडी सांगितल्या! डीजे अण्णांकडे बघतच राहिला, डीजेच नाही आम्ही सुद्धा अवाक झालो होतो! विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाचे नियोजन अण्णा मागील 7 दिवसांपासून करत होते आणि तेही हातात सलाईन लावून! 18-18 तास नियोजन अन सलाईन, फारतर 3 ते 4 तासांची झोप!


अण्णांच्या या उत्कृष्ट नियोजन कौशल्याची ओळख आता जिल्ह्यातच नाही तर राज्यात प्रसिद्ध झाली आहे. या पलीकडे जाऊन अण्णांच्या कामाचे आणखी काही पैलू आहेत. 


सकाळी 11 ते रात्री 11, कधी कधी त्याही पुढे जाऊन अण्णा धनुभाऊंच्या जगमित्र कार्यालयात बसून कोणत्याही अपेक्षेशिवाय लोकसेवा करत असतात.


दवाखान्याची अडचण आहे अण्णा आर्थिक मदत पाहिजे, माय धरा एवढे पैसे आणि करा दवाखाना, अजून अडचण आली तर या. अण्णा लेकीचं लग्न आहे, अमुक वस्तू पाहिजे, दादा अमुक दुकानात जावा, लग्नाला लागणारं सगळं सामान घेऊन जावा. दवाखान्याची अडचण, घरगुती अडचण, लग्न कार्यात मदत अशी शेकडो लोकं दररोज अण्णांकडे येतात, धनुभाऊंच्या वतीने अण्णा कोणालाही निराश करून पाठवत नाहीत. सकाळी पोतंभर पैसे घेऊन ऑफिसला बसले तरी संध्याकाळी घरी जाताना अण्णांकडे गाडीत डिझेल टाकायला पैसे शिल्लक नसतात, इतका दिलदार स्वभाव, क्वचितच कुणाचा आढळतो.


परळी मतदारसंघातील व बहुतांश बीड जिल्ह्यातील अनेक लोक आपल्या सार्वजनिक मागण्या, अडचणी घेऊन येतात. अशावेळी अण्णा प्रश्न-समस्या समजून घेऊन त्याच्या उत्तरालाच समोर बोलावून घेतात आणि प्रश्न जागच्या जागी निकाली निघतो. त्यामुळे अण्णांच्या कर्तवनिष्ठ स्वभावाचे देखील जिल्ह्यात उदाहरण दिले जाते.


धनुभाऊ मुंबईत असताना, राज्याच्या कारभारात व्यस्त असताना संपूर्ण मतदारसंघ व जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांपासून ते सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी अण्णा तासनतास बसून सोडवत असतात. हा त्यांचा नित्यक्रम आहे. हे काम करत असताना अण्णांनी अनेकांचे संसार उभे करण्याचे पुण्यकर्म केले आहे. अनेकांच्या घरी धनुभाऊंच्या आणि अण्णांच्या दिलदार स्वभावामुळे आज चुली पेटतात, त्यांचा एक छोटासा सहकारी, टीम मधील एक सदस्य म्हणून या बाबीचा उल्लेख करताना उर भरून येतो. त्यांचा टीम मेम्बर असल्याचा गर्व-अभिमान वाटतो.


आज मतदारसंघासह सबंध बीड जिल्ह्याची मोट एकत्रित बांधत असताना धनुभाऊंच्या बेरजेच्या राजकारणाची सवय अण्णांनी चोख सांभाळली आहे. विरोधकांना संपवायचे नाही तर त्यांच्या मनातील विरोध संपवून समोरच्याला आपलेसे करायचे हा बेरजेच्या राजकारणाचा नियम अंगीकारत अण्णा व पर्यायाने धनु भाऊ अजातशत्रू व्यक्तिमत्व बनत चालले आहेत. हे सगळं करत असताना अण्णा नेहमी स्पष्ट करतात की, 'माझं जे काही आहे ते सगळं माझ्या साहेबासाठी, माझं स्वतःचं, वेगळं असं काही नाही'!


आपण एखाद्या नेत्यांचा साधा सत्कार केला तरी आपल्या मनात अपेक्षा घर करून असतात, पण कोट्यावधी खर्चून मोठमोठे कार्यक्रम, सभा यशस्वी करणारे वाल्मिक अण्णा कधीही स्टेजवर दिसत नाहीत, ते कडीकोपऱ्यात बसून नियोजनावर लक्ष ठेऊन असतात. कुठलाही बडेजाव, स्वागत-सत्कार, मान-पान असं काहीही त्यांना नको असतं. कित्येकवेळा जाहीर कार्यक्रमात स्टेजवर बोलावून सुद्धा अण्णा जायचे टाळतात, हे सर्वांनी पाहिलय! त्यामुळे जिथं कमी तिथं आम्ही, अशी कार्यपद्धती जोपासणाऱ्या अण्णांना स्वतःची वेगळी काही राजकीय महत्त्वाकांक्षा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


तिरुपतीच्या बालाजी भगवानांच्या एवढे मोठे मन असूनही 12 महिने बिन चपलाचे अनवाणी फिरणारे वाल्मिक अण्णा यांची कर्तव्य निष्ठा आणि स्वामी निष्ठा पाहून, कुठल्याही मोठ्या नेत्याच्या मनात 100% एकदा हा विचार येतोच, "यार वाल्मिक अण्णा सारखा एक सोबती आपल्यालाही हवाच!"


आदरणीय वाल्मिक अण्णा कराड यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन.... 


✍️ सुधीर सांगळे, बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !