महर्षी दयानंदांचे विचार व कार्य जगासाठी उपकारक -आंतरराष्ट्रीय संघटक विनय आर्य यांचे प्रतिपादन

 महर्षी दयानंदांचे विचार व कार्य जगासाठी उपकारक -आंतरराष्ट्रीय संघटक विनय आर्य यांचे प्रतिपादन



     परळी वैजनाथ दि.५-

  महर्षी दयानंद यांनी अज्ञानयुगात वावरणाऱ्या मानव समूहाला वैदिक ज्ञानाच्या प्रकाशात आणून शाश्वत आनंदाने जगण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या  मूलभूत कार्याची व शिकवणीची  नव्याने मांडणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय आर्य समाज संघटक श्री विनय आर्य यांनी केले .

        गेल्या तीन दिवसांपासून येथील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात सुरू असलेल्या महर्षी दयानंद द्विन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे स्थानिक प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वैदिक विचारवंत प्रा. सोनेराव आचार्य,पं. प्रियदत्त शास्त्री, पं. राजवीर शास्त्री, वैदिक विदुषी सविता आचार्या, महेश वेलानी,पं. सत्यवीर शास्त्री आदी उपस्थित होते.

      श्री विनय आर्य यांनी यावेळी महर्षी दयानंद यांच्या ऐतिहासिक जीवन व कार्यातून समग्र समस्यांचे समूळ निवारण होते, असे सांगून  स्वराज्य, स्वदेशी, गोरक्षण, कृषिकार्य, दलितोध्दार ,स्त्रीसुधार ,जातिभेद निर्मूलन, स्वभाषा, स्वसंस्कृती, गुरुकुल शिक्षणपद्धती स्वातंत्र्य आंदोलन या संदर्भात  ते सर्वात अग्रेसर होते, असे सांगितले. ते म्हणाले - महर्षी दयानंद यांची वैचारिक भूमिका "बहुजन हिताय बहुजन सुखाय!" अशी होती. अशा थोर समाज सुधारकाच्या क्रांतिकारी विचारांकडे गेल्या शंभर वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. याकरिता अभ्यासू विचारवंतांनी स्वामीजींचे वैदिक विशुद्ध विचार जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

      याच कार्यक्रमात तपोनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री स्वामी सोममुनिजी  यांच्या शतायुष्यपूर्तीबद्दल श्री आर्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .  यावेळी ज्येष्ठ  वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, संन्यासी, वानप्रस्थी, गुरुकुलांचे यशस्वी स्नातक, समाजसेवी कार्यकर्ते आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सविता आचार्य व सुवर्णा उदय तिवार यांनी स्वागत गीत सादर केले.

स्वामी दयानंद हे सर्वाग्रणी समाजसुधारक-माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड



            दरम्यान रात्री पार पडलेल्या "महर्षी दयानंद यांची प्रासंगिकता " या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात माजी केंद्रीय मंत्री श्री जयसिंगराव गायकवाड पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. श्री गायकवाड यांनी स्वामी दयानंद यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला . संपूर्ण जगात सर्वात प्रथम वेदांचा विशुद्ध विचार मांडणारे स्वामी दयानंद हे मानवतेचे खरे उपासक होते. पशुंप्रमाणे आयुष्य कंठणाऱ्या मानव समाजाला सुखाने जगण्याचा वैदिक मूलमंत्र त्यांनी दिला. स्वार्थापोटी निर्माण झालेल्या उच्च-नीच, मत-पंथ, जातीपाती इत्यादी भेदभाव, अंधश्रद्धा व रूढी परंपरांना स्वामीजींनी आपल्या तार्किक शक्तीने  परास्त करून मानवी मूल्यावर आधारित 'आदर्श मानव समाज' निर्माण केला. ते खऱ्या अर्थाने सर्वाग्रणी जगाचे समाजसुधारक होते.

           यावेळी अध्यक्षस्थानी राज्य आर्यसभेचे मंत्री श्री राजेंद्र दिवे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.नयनकुमार आचार्य, सूत्रसंचालन प्रा. डॉ. नरेंद्र शिंदे व प्रा .डॉ .अरुण चव्हाण यांनी केले, तर शेवटी आभार श्री लक्ष्मण  आर्य गुरुजी यांनी मानले.                      यासोबतच महिला संमेलन देखील पार पडले. अध्यक्षस्थानी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लीलावंती वेलानी या होत्या. यात सविता आचार्या ,मधुमती शिंदे, लीलावती जगदाळे, डॉ हर्षा भायेकर, प्रा. डॉ .वीरश्री आर्या ,रेखा आर्या, पंडित राजवीर जी शास्त्री आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा आचार्य व दीक्षा आचार्य यांनी केले.

          या भव्य स्वरूपाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमास ठिकठिकाणाहून जवळपास एक हजार कार्यकर्ते व महर्षी दयानंदांचे अनुयायी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !