जनतेने आतापर्यंत जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता जनसेवेचे कार्य करणाऱ्यालाच प्राधान्य दिले

 बीडमधील मतदार हा जाणता राजा ; सन्मानजनक विजयाची मला खात्री- पंकजा मुंडे


जनतेने आतापर्यंत जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता जनसेवेचे कार्य करणाऱ्यालाच प्राधान्य दिले

 

पुणे,।दिनांक २१।

 बीड जिल्ह्यातील जनता ही राजकीय दृष्ट्या अतिशय परिपक्व व प्रगल्भ आहे. बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहासही असाच राहिला आहे. जातीपातीच्या राजकारणात न पडता बीड येथील जनतेने आत्तापर्यंत जाणतेपणानेच प्रामाणिकपणे जनसेवेचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपला खासदार निवडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मतदार हा जाणता राजा असून या जाणत्या राजाचे आपल्यावर भरभरून आशीर्वाद व प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला सन्मानजनक विजयाची नक्कीच खात्री असल्याचा आत्मविश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

    पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला पंकजा मुंडे यांनी आज ( गुरूवार) भेट दिली. यावेळी आ. माधुरी मिसाळ त्यांच्यासमवेत होत्या. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांबरोबर संवादही साधला. बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच आपल्या मतदार संघात जात असुन  मार्गात असलेल्या भाजप उमेदवाराची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी युवा मोर्चात सहकारी म्हणून काम केले आहे. मुंडे साहेबांबरोबरही ते होते. मुंडे साहेबांचे ते लाडके कार्यकर्ते होते. मोठी बहिण म्हणून त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आले आहे असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

    तुम्हाला बीड मध्ये अडकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्षाकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे या प्रश्नावर उत्तर देताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, असे काहीही नाही. मला निवडणूक नवी नाही. लोकशाहीत प्रत्येक पक्ष निवडून येण्याच्या दृष्टीनेच आपला उमेदवार देत असतो. त्यामुळे विरोधी पक्षही या जागेवर मोठा उमेदवार देणार हे गृहीतच असते असं त्या म्हणाल्या.


बीडमध्ये जातीपातीच्या राजकारणाला कधीच थारा  नाही

------

सध्याच्या मराठा आरक्षण प्रश्न व या सर्व वातावरणात तुमच्या निवडणुकीवर परिणाम होईल का ? जातीआधारित मतदानाचा फटका बसेल का? या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या बीड जिल्ह्याची जनता ही अतिशय सुज्ञ व काम करणाऱ्या माणसाला मोठे करणारी जनता आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना या जनतेने भरभरून प्रेम दिले असून मुंडे साहेबांनंतर बीड जिल्ह्यातील जनतेने मला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळले आहे. बीड जिल्ह्यातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला कधीच थारा दिला नाही हा बीड जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विकास कामे व जनसेवेचे निकष बघूनच जनतेने आजपर्यंत आपला खासदार निवडलेला आहे. बीड जिल्ह्यातील जाणत्या मतदार राजावर आपला संपूर्ण विश्वास असून मुंडे साहेबांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करण्याची आपल्याला शिकवण दिली आहे आणि आपणही त्याच तत्त्वाचा अंगीकार आजपर्यंतच्या राजकारणात केला आहे. त्यामुळे सर्व जातीधर्माच्या लोकांचा माझ्यामागे आशीर्वाद व प्रेम आहे. मी बीडची पालकमंत्री होते त्यावेळीही कधीही जाती, धर्म ,पक्ष, गाव आदी काहीही न बघता विकास कामे केली आहेत. हे आमच्या बीड जिल्ह्यातील जनतेला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे सन्मान जनक विजयाची आपल्याला संपूर्ण खात्री असल्याचा आत्मविश्वास पंकजाताई मुंडे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला .

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार