देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव

 देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव

परळी / प्रतिनिधी 


देवाच्या नावाने चालणारे अनेक कीर्तन महोत्सव पाहिले, परंतु शेतक-यांच्या नावाने सुरू असलेला हा एकमेव कीर्तन महोत्सव आहे, असा सूर शेतकरी कीर्तन महोत्सवात आलेल्या सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ख-या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ही सुरूवात म्हणता येईल,  असे मतही अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.

शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन 21 गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरू केलेल्या कीर्तन महोत्सवाचा दुसरा दवस विविध उपक्रमाने संपन्न झाला. सकाळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही सहभागी झाली होती. 

●●●●●●●●●●●●●

*सुविधा वाढल्या,समाधान हरवले - डाॅ. हमीद दाभोळकर*

जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अनेक सुविधा वाढल्या आहेत. सुविधा वाढल्या असल्या तरी माणूस समाधानी झाला नाही उलट तो अधिक तणावात गेला आहे. विशेषतः 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिडताना दिसत आहे. त्यातून आपल्या देशात वर्षाला ऐकूण दोन लाख आत्महत्या होत आहेत. त्यात तरुणांचे प्रमाण अर्ध्याहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. इतर रोगावर ज्या तातडीने उपचार घेतले जातात तितके मानसिक आजारावर घेतले जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतकरी कीर्तन महोत्सवातून वैचारिक  प्रबोधनाबरोबर  शेतक-यांच्या आरोग्याची काळजी  घेत असल्याबद्दल डाॅ. दाभोळकर यांनी समाधान व्यक्त केले.

●●●●●●●●●●

*गुरुदेव संप्रदायाच्या भजनाने शेतकरी श्रोते मंत्रमुगध*

शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या दुस-या दिवशीच्या संध्याकाळच्या सत्रात तुकडोजी महाराजांची भजने आणि ग्रामगीतेवर ज्ञानेश्वर दादा रक्षक आणि रवी मानव यांची प्रवचने झाली. गुरूदेव संप्रदायाच्या वतीने केलेल्या सादरीकरणात मोजरी येथील तुकडोजी महाराज गुरूकुलातील विद्यार्थ्यांनी भजने गायली. सहावी ते आठवीच्या वर्गात शिकणा-या या मुलांच्या भजनानी श्रोते मंत्रमुग्ध झाले. रवी मानव आणि ज्ञानेश्वर दादा रक्षक यांनी ग्रामगीतेतील पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मुलन, मुलींचे शिक्षण यावर उत्तम प्रबोधन केले.

●●●●●●●●●●●

*महिलांचा सन्मान ही संतांची शिकवण- विजय महाराज गवळी*

जगद्गुरु तुकाराम महाराज यांना बदनाम करण्यासाठी देशात व्यवसाय करणा-या स्रीला त्यांच्याकडे पाठविले जाते. पण महाराज किंचितही विचलित होत नाहीत, उलट तिला - 

*जाई ओ तू माय न करी सायास l*

*आम्ही विष्णूदास तैसे नहो ll*

असे बोलून तिला परत पाठवतात. हीच शिकवण शिवाजी महाराज यांना तुकाराम महाराज यांच्याकडून मिळाली. म्हणून नजराना म्हणून आणलेल्या कल्याणच्या शुभेदा-याच्या सेनेची शिवाजी महाराज यांनी बोळवण करून परत पाठवली केली. यातून  इंद्रिय निग्रह आणि स्रियांच्या सन्मानाची संतांची भूमिका स्पष्ट होते, असे रात्रीच्या कीर्तनात विजय महाराज गवळी म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !