सीटूचा परळीत कामगार मेळावा संपन्न!

 कामगारांच्या कष्टातूनच या संपूर्ण जगाची निर्मिती - रोहिदास जाधव


सीटूचा परळीत कामगार मेळावा संपन्न!


परळी (ता.१) : कामगारांच्या श्रमातूनच या सुंदर जगाची निर्मिती झालेली आहे. म्हणून कामगारांची मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटीला सलाम आणि सन्मान करण्याचा दिवस म्हणजे जागतिक कामगार दिन आहे. असे मत एसएफआयचे राज्य सचिव व अर्थशास्त्र विषयाचे संशोधक  रोहिदास जाधव यांनी व्यक्त केले.


सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) कामगार संघटनेच्या वतीने आज दिनांक १ मे रोजी परळीत कामगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी रोहिदास जाधव बोलत होते. मेळाव्याची सुरुवात सीटूचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रभाकर नागरगोजे यांच्याहस्ते श्रमिकांच्या लाल झेंड्याचे ध्वज फडकावून करण्यात आली.


जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शहरातील आर्य समाज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीटूचे नेते किरण सावजी हे होते. सीटूचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे, जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात, ज्येष्ठ नेते प्रा. प्रभाकर नागरगोजे, सुवर्णाताई रेवले यांनी सुद्धा मेळाव्यास मार्गदर्शन केले.


पुढे बोलताना रोहिदास जाधव म्हणाले की, 'आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कामगार-श्रमिकांच्या कष्टावर आधारलेली आहे. पण कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. कामगारांच्या शोषणातून आणि सध्याच्या भाजप सरकारची मेहरबानी आणि मोदीच्या गॅरंटीमुळे अदानी आणि त्यांचे दोस्त मात्र रातोरात मालामाल होताहेत. सध्याचे केंद्रातील धर्मांध भाजप सरकार शेतकरी, कामगारांना दीडदमडीची मदत करत नाही. परंतु बड्या-श्रीमंत उद्योजकांना क्षणार्धात लाखों रुपयांची कर सवलत देतं. भ्रष्टाचारमुक्त देश घडवायची पोकळ भाषा करणाऱ्यांचा भाजप आता संपूर्णपणे 'भ्रष्टाचारी जनता पक्ष' बनला आहे. करोडोचा गैरव्यवहार करणाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला की त्यांना क्लीनचीट मिळतेय. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही. उलट त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप आणि त्यांचे प्यादे देशविरोधी ठरवून शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा बेगडी प्रयत्न करतात. परंतु हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्यांना भाजप देशाच्या बाहेर पाठवून त्यांना पाठीशी घालत आहे. लोकशाहीला रसातळाला नेऊन भाजपने धर्मांधतेचा नंगा नाच सुरु केला आहे. सत्तेचा माज चढलेल्या भाजपचा खरा चेहरा ओळखून अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या मुसक्या आवळणे, आजची खरी गरज आहे. म्हणून सध्याचे भाजप सरकार कुणासाठी काम करतंय, हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.'


सीटू जिल्हाध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, 'कामगारांनी सजग बनले पाहिजे. खरे काय अन् खोटे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या भाजपकडून खोटा इतिहास सांगितला जातो. इतिहासाला मोडून तोडून मांडण्याचा प्रयत्न होतो. परंतु जे वास्तव आहे, जे खरे आहे, ते आपण सर्वांनी समोर आणले पाहिजे. आज कामगारांच्या समस्यांकडे भाजप सरकार संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. म्हणून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचा पराभव होणे आवश्यक आहे. म्हणून कामगारविरोधी व धर्मांध भाजपला हरवू शकणाऱ्या महाविकास आघाडीला कामगार संघटनांनी समर्थन दिले आहे. बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना कामगारांनी प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


सीटू जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात बोलताना म्हणाले की, 'आपली सीटू ही कामगार संघटना देशभरात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडते. त्यांच्या न्यायाची लढाई लढते. आज जगातिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन एकत्र साजरा करताना आपण सीटूचा विस्तार करून तिला मजबूत करण्याचा निर्धार केला पाहिजे. तसेच देशातल्या लोकशाहीला वाचविण्यासाठी भाजपच्या विरोधात, महाविकास आघाडीला मत देऊन निवडून दिले पाहिजे.'


सीटू आयोजित या मेळाव्याचे प्रास्ताविक जावेद शेख यांनी केले; जालिंदर गिरी यांनी आभार मानले; तर सूत्रसंचालन प्रकाश वाघमारे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी, सय्यद सल्लाउद्दीन, अर्जुन सोळंके, शेख मुसा, साईबाबा कांबळे, शेख सलीम, संदेश सरवदे, बाबा दस्तगिर, अजहर शेख, बाबासाहेब रोडे, मुंजा तळेकर, चांद पाशा यांनी अथक परिश्रम घेतले. मेळाव्यास परळी शहर आणि तालुक्यातील कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


'जगातील कामगारांनो एक व्हा', 'जागतिक कामगार दिन जिंदाबाद', 'महाराष्ट्र दिन चिरायू होवो', 'इन्कलाब जिंदाबाद', 'लाल बावटा जिंदाबाद' या घोषणांनी मेळाव्याचा समारोप झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !