ऐन उन्हाळ्यात वैद्यनाथ मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !
श्री वैद्यनाथ देवस्थानने सावलीसाठी मंडप उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय-अभयकुमार ठक्कर
ऐन उन्हाळ्यात वैद्यनाथ मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी –
एप्रिल संपला आता मे महिना चालू झाला असून उन्हाचा पारा 40 अंशांपर्यंत पोचला आहे. उन्हाचे चटके भाविकांना मोठ्या प्रमाणात बसत असून श्री वैद्यनाथ मंदिर प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे श्री वैद्यनाथ मंदिरात भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप उभारणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष श्री अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केली असून लवकरात लवकर मंडप उभारणी करून भाविकांची होणारी पायपोळ थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यंदा हे महिना उजाडला, तरीही वैद्यनाथ देवस्थान कमिटीकडून अद्याप मंडप उभारण्यात आलेला नाही. यामुळे भाविकांना मंदिर परिसरात उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी ९ पासूनच उन्हाचे चटके बसण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून फरशांना पांढर्या रंगाचा कोट मारणे अपेक्षित आहे, तेही करण्यात आलेले नाही. सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक भक्त मंदिरात येतात. या भाविकांना उन्हापासून संरक्षण देणारी कोणतीही व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली नाही. मंदिर परिसरात जागोजागी पाणपोई करणे अपेक्षित असतांना ती नसल्याने भाविकांनी पाणी विकतच घेऊन प्यावे लागत आहे. यात भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचेही श्री अभयकुमार ठक्कर यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा