आईच्या सेवा गौरवाने मानवाचा इहलोक व परलोक सफल होतो - कुलगुरू डॉ .महावीर आचार्य
माता कौशल्यादेवी लोहिया गौरवार्थ आयुष्कामेष्टी यज्ञ , ग्रंथतुला व मातृ-वंदना कार्यक्रम
आईच्या सेवा गौरवाने मानवाचा इहलोक व परलोक सफल होतो -कुलगुरू डॉ. महावीर आचार्य
परळी वैजनाथ दि.२९--
या जगात आई हे सर्वात मोठे दैवत असून जीवनात सर्व काही मिळो वा न मिळो, पण ज्याला आईचे कृपाछत्र लाभते, ते मानव भाग्यशाली समजले जातात. अशा मातेचा जे जीवनभर मनोभावे सेवा- सत्कार करतात, त्यांना सर्व प्रकारच्या सुख व ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि त्यांचा इहलोक व परलोक सफल ठरतो, असे उद्गार प्रसिद्ध विचारवंत व हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महावीर आचार्य यांनी काढले.
येथील अक्षता मंगल कार्यालयात आदर्श माता श्रीमती कौशल्यादेवी रामपाल लोहिया यांच्या ९१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ग्रंथतुला, आयुष्कामेष्टी यज्ञ व मातृ-वंदना समारंभात डॉ .श्री आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शतायुषी तपस्वी समाजसेवक स्वामी सोमानंद सरस्वती हे होते. प्रारंभी श्रीमती लोहिया यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल ,मानपत्र व पुष्पहार प्रदान करून सत्कार करण्यात आला.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. महावीरजी यांनी मानवी जीवनात आईचे महत्व विशद करून जिवंतपणी तिची श्रद्धेने सेवा करण्याने सर्वदृष्टीने जीवन यशस्वी होते,असे सांगून लोहिया परिवाराने केलेल्या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा केली. यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, डॉ . हंसराज बाहेती, राज्य आर्य समाजाचे सचिव राजेंद्र दिवे , उग्रसेन राठौर, डॉ. नयनकुमार आचार्य, लक्ष्मणराव आर्य गुरुजी आदींनी विचार मांडले. व्यासपीठावर स्वामी विद्यानंद सरस्वती, भजन गायिका अमृता शास्त्री, डॉ. विना आर्या व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक श्री जुगलकिशोर लोहिया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी केले, तर आभार वैष्णवी प्रेमचंद लोहिया यांनी मानले.
ग्रंथतुला, यजुर्वेद पारायण व आयुष्कामेष्टी यज्ञ
दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या यजुर्वेद पारायण यज्ञाची सांगता सकाळी झाली. तर श्रीमती कौशल्यादेवी लोहिया यांच्या दीर्घायुष्यासाठी आयुष्कामेष्टी यज्ञ संपन्न झाला. श्रद्धानंद गुरुकुलाचे आचार्य श्री सत्येन्द्रजी यांनी या यज्ञाचे ब्रह्मापद भूषविले. तर वेदपाठी विद्वान सर्वश्री डॉ. वीरेंद्र शास्त्री, डॉ. अरुण चव्हाण, डॉ . नयनकुमार आचार्य यांनी यजुर्वेदाच्या मंत्रांचे पठण केले. तर विस्तृत यज्ञाचे संपूर्ण व्यवस्थापन रंगनाथ तिवार, लक्ष्मणराव आर्य , सोमेंद्र आर्य व गुरुकुलच्या ब्रह्मचाऱ्यांनी केले. दररोज वेगवेगळ्या यजमानांनी यज्ञस्थळी उपस्थित राहून श्रद्धेने आहुत्या प्रदान केल्या. याबरोबरच सकाळी व संध्याकाळी दिल्ली येथून आमंत्रित भजनगायिका अमृता शास्त्री यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यानंतर वैदिक विद्वान डॉ. महावीरजी आचार्य यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात परळी शहर व परिसरातील आणि विविध ठिकाणचे असंख्य नागरिक नागरिक सहभागी झाले होते. हा त्रिदिवसीय कार्यक्रम सफल करण्यासाठी लोहिया परिवार व इतर कार्यकर्त्यांनी बहुमोल प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा