आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ
आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ
शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, ३१ मे अंतिम मुदत असल्याने त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. अर्थात, त्यापूर्वीच जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आता शाळा प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) काढावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्याच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला विरोध दर्शवत पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पालकांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर पालकांकडून आरटीई प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
‘आरटीई’अंतर्गत वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार खासगी शाळांतील प्रवेशासाठीची अर्ज नोंदणी १७ मेपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ मे ही अर्ज नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या एक लाख ८७ हजार अर्जांमध्ये आणखी अर्जांची भर पडणार आहे.
आता मुदतवाढ नाही...
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मे असून, पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेशप्रक्रिया जूनमध्ये सरू होत असल्याने ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस दिनांक ३१ मेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा