विद्याभारती देवगिरी प्रांताची विमर्श विषयावरील कार्यशाळा संपन्न

 भारतीय संस्कृतीचा पाया असणारी कुटुंब व्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत -ॲड. रोहित सर्वज्ञ 




विद्याभारती देवगिरी प्रांताची विमर्श विषयावरील कार्यशाळा संपन्न

...................

दिनांक आठ मे प्रतिनिधी 

राष्ट्रीय संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम सध्या होत आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असणारी एकत्रित कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन असणारे विमर्श प्रस्थापित करून हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत. चुकीचे विमर्श समाजावर थोपविले जात आहेत त्यामुळे समाजातील प्रज्ञावंतांनी अभ्यासपूर्वक प्रकट व्हायला हवे. चुकीचे तात्विक,सैद्धांतिक विमर्श समाजासमोर स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विमर्श विभागाचे प्रांतप्रमुख ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी व्यक्त केले. 

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या वतीने नांदेड येथे विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा नांदेड येथील सहयोग कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण वर्ग दिनांक 7 मे ते 8 मे कालावधीत पार पडला. यावेळी विद्याभारतीचे अखिल भारतीय महामंत्री मा. अवनीशजी भटनागर, पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे, पश्चिम क्षेत्रमंत्री शेषाद्री डांगे, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ. विवेक काटदरे , प्रांतमंत्री प्रकाश पोतदार, प्रांत सहमंत्री दिनेश देशपांडे, प्रांत संघटनमंत्री शैलेश जोशी, क्षेत्र समरसता विषयप्रमुख निलेश गद्रे, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. सुरेश आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, विद्याभारतीच्या प्रांत उपाध्यक्षा डॉ .प्रज्ञाताई तल्हार, नितीन शेटे,  नांदेड जिल्हाध्यक्षा तथा वर्ग प्रमुख देवदत्त देशपांडे, नांदेडच्या जिल्हा मंत्री तथा वर्गाच्या व्यवस्थाप्रमुख कल्पना कांबळे, महानगरमंत्री आदित्य तुंगेनवार यांचीही उपस्थिती होती. 

प्राचीन भारतामध्ये सुसंबद्ध रचनात्मक शिक्षण व्यवस्था अस्तित्वात होती. परंतु लॉर्ड मेकाॅले  याने भारतीय शिक्षण व्यवस्थेला छिन्नविछिन्न केले. नेहमीच परकीयांनी ज्या ठिकाणी समृद्धी आहे, त्याच ठिकाणी आक्रमण केले हा इतिहास आहे. विदेशी कंपन्यांसाठी भारत हे सर्वात मोठे मार्केट असल्यामुळे वेगवेगळ्या जाहिराती करून भारतीय लोकांना भ्रमित केले जात आहे. त्यासाठी भारतीय संस्कृतीची तोडफोड केली जात आहे. न्यायव्यवस्थेमध्ये चार डोके एकत्र येऊन न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जातो. समाजातील स्तंभलेखक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी, वक्ते, कलाक्षेत्रातील व अभिनयातील प्रज्ञावंतांनी वेगवेगळ्या माध्यमातून एकत्रित येऊन समाजापुढे तथ्यावर व सत्यावर आधारित विमर्श समोर आणले पाहिजेत.

यावेळी बोलताना निलेश गद्रे म्हणाले, हिंदू  शब्द देशाला एकत्रित बांधणारे, समान सूत्र आहे. हिंदुत्वाला तोडण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. प्रत्येक जातीधर्मात भांडणे लावली जात आहेत. आदिवासी जनजाती, पूर्वांचल यांना देशापासून तोडण्याचे डाव खेळले जात आहेत. प्राचीन भारतामध्ये बारा बलुतेदारांनी गावामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या व जगभरात या वस्तू विकल्या होत्या. हिंदूंच्या पराभवाचे मूळ कारण हे जातीभेदांमध्ये दडलेले आहे. या देशात पराक्रमाची परंपरा कधीही कमी नव्हती परंतु भेदभावाची परंपरा असल्यामुळे आपल्या पराक्रमी योद्धांचा पराभव झाला. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारी बलुतेदारी व्यवस्था संपविली गेली.

 जात ही व्यवस्था नसून अव्यवस्था आहे. त्यामुळे जाती गुंडाळल्या पाहिजेत. जाती फेकून दिल्या पाहिजेत. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. तसेच आपल्या धर्मग्रंथांचे पुनर्मुल्यांकन झाले पाहिजे. 

संघाचे पूर्व सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत असे सांगितले होते.प.पू. गोळवलकर गुरुजी यांनी 1966 मध्ये उड्डपी येथे घेतलेल्या विशाल हिंदू संमेलनामध्ये ' मम मंत्र समानता' याची घोषणा केली होती. आपण सगळे एकाच आईची लेकरे आहोत. त्यामुळे आपल्यांमध्ये भेदभाव , उच्चनीचता नकोत असे त्यांनी म्हटले होते. आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणून गोळवलकर गुरुजी यांनी हे हिंदू संमेलन सांगितले होते. भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्याची दिशा जरी भिन्न असली तरी उद्देश मात्र एकच आहे. या देशांमध्ये समता, बंधुता, न्याय संवैधानिक मूल्ये प्रस्थापित करण्याचे काम या दोघांनी केलेले आहे. बहिष्कृत भारत या नियतकालिकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत हे सनातन हिंदू राष्ट्र आहे असे सांगितले होते. नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना रा.स्व. संघाच्या विरोधात काहीही बोलले नव्हते. तरी काही बुद्धिवादी लोक संघ व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे परस्परभिन्न होते असे खोटे विमर्श समाजापुढे आणतात. यामधील तथ्य समाजाला समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

शेषाद्री डांगे यांनी 'करणीय कार्य' या विमर्श विषयावर बोलताना सांगितले,' समाजातील नकारात्मक मानसिकता कमी करावी लागणार आहे. हिंदूंच्या श्रद्धामूल्यांवर व जीवन पद्धतीवर प्रश्न उपस्थित करून बदनामी केली जात आहे. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये संविधानाचे स्थान सांगण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांची आहे यासाठीचे मूलभूत चिंतन करून आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये हे सर्व जबाबदारीचे घटक आले पाहिजेत. केवळ व्यासपीठावर विमर्शांविषयी बोलून चालणार नाही. याविषयीची कृतीशीलता आपल्याला दाखवावी लागणार आहे. आमच्याकडे सर्वच क्षेत्रातील श्रेष्ठता असली तरी वर्तनातील  भारतीयता आता कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाला पर्याय म्हणून ज्यांनी स्वदेशी वस्तूचे उत्पादन केले, त्यांना वेगवेगळ्या यंत्रणा बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे षडयंत्र रोखण्यासाठी आवश्यक असणारे सज्जनशक्तीचे समाजमन कोण घडवणार आहे? विमर्श हे शस्त्र व शास्त्र आहे. सातबारा माझा व शेतावरील  वहिती मात्र दुसऱ्याची हे भविष्यामध्ये चालणार नाहीत. आपल्या मुलांचे भावबंध आई-वडिलांशी जुळायला हवेत. राष्ट्रीयत्वाचा धागा व भारतीय मूल्यांचा अंगिकार करणारी पिढी शिक्षकांनी घडविली पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील व खानदेशातील जळगाव, धुळे जिल्ह्यातील शिक्षक, विचारवंत, पत्रकार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी