भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 73 वा वर्धापन दिन भेल संस्कार केंद्रात मोठ्या हर्षोल्लसात
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 73 वा वर्धापन दिन भेल संस्कार केंद्रात मोठ्या हर्षोल्लसात
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या भेल संस्कार केंद्रात संस्थेचा 73 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. 28 जून ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा उमटवणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 73 वा वर्धापन दिन आहे. ध्येयनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रींचा अवलंब करीत ही संस्था अविरतपणे आपली वाटचाल करत आहे. अशा या संस्थेत विद्यार्थ्यांना भारतीयत्वाचे शिक्षण देऊन माणूस घडवणाऱ्या या शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणजेच आजचा हा भेल संस्कार केंद्रातील कार्यक्रम होय. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय मा. श्री. जीवनराव गडगूळ यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री.राडकर सर आणि श्री. यशवंत कांबळे सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. श्री.जीवनराव गडगूळ पुढे बोलताना भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या जडणघडण आणि इतिहास इ. गोष्टींची माहिती व्यक्त करतात. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई या संस्थेची 28 जून 1951 रोजी स्थापना करण्यात आली. संस्थेला 73 वर्षाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध अशी परंपरा आहे. तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि निष्कलंक चारित्र्याची गोडी निर्माण करणे हे एकमेव उद्दिष्ट या संस्थेचे आहे. तसेच मानवनिर्मित आणि चारित्र्य निर्मितीद्वारे राष्ट्रीय उभारणी करणे, त्याबरोबरच वेगाने बदलणाऱ्या जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मूल्याधिष्ठीत शिक्षण देणे, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजविणे, समाजात शिक्षणाच्या मूल्यांची जाणीव निर्माण करणे व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे त्याबरोबरच राष्ट्रीय विकासात योगदान देणे इ. संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यासाठी संस्थेअंतर्गत सर्व शाळांमध्ये वरील उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रत्येक जण कार्यरत असतात असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी अमोल विकासराव डुबे (अध्यक्ष, शालेय समिती) जीवनराव गडगूळ (कार्यवाह) इंजि.देशपांडे साहेब, सौ. शोभा भंडारी मॅडम (सदस्य) गिरीश ठाकूर सर (प्राचार्य) सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नामदेव मुंडे सर यांनी तर सौ.पुनम मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाची सांगता सार्वजनिक पसायदान घेऊन करण्यात आली. अशी माहिती भेल संस्कार केंद्राचे प्रसिद्ध प्रमुख श्री. प्रफुल्ल सर यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा