शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम ......!
डॉक्टर, इंजिनियर विद्यार्थी घडविण्याऐवजी जबाबदार नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी-सौ. श्रद्धा चनाखेकर
नांदेड - दि. १५जून २०२४
डॉक्टर इंजिनियर विद्यार्थी घडविण्यापेक्षा या देशाचे जबाबदार व संवेदनशील, पर्यावरण संवर्धक नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अभ्यासेतर उपक्रम, छंद, खेळ यात सहभागी होणे गरजेचे आहे. सध्या पालकांना केवळ मोठ्या इमारती व सूटबूट , टाय मधील विद्यार्थ्यांच्या शाळा पसंत पडत असल्या तरी अशा शाळांमधून केवळ परीक्षार्थी विद्यार्थी घडविले जातात.परंतु भौतिक सुविधा कमी असतानाही लहान शाळांमधूनही संस्कारक्षम शिक्षण व गुणवत्ता मिळू शकते हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित नांदेडच्या कै. नाना पालकर प्राथमिक शाळेने सिद्ध केले आहे असे प्रतिपादन नांदेड येथील सुप्रसिद्ध गायिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा चनाखेकर यांनी केले. तसेच स्पर्धा परिक्षांमधून यश मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे दाखले त्यांनी यावेळी दिले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित कै. नाना पालकर प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै नाना पालकर प्रा विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव , नवागतांचा स्वागत सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मापारे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आकाशवाणीच्या निवेदिका तथा पत्रकार सौ अर्चना दिलीप शिंदे, सुप्रसिद्ध गायिका सौ. श्रद्धा चनाखेकर, शालेय समितीचे सदस्य प्रा. संतोष कुलकर्णी, अनिल डोईफोडे, मुख्याध्यापक रमेश सातपुते यांची यावेळी उपस्थिती होती.
शालेय जीवनांमध्ये विद्यार्थ्यावर घडणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी उत्तम ग्रंथ व वर्तमानपत्र वाचनाची सवय विद्यार्थ्यांनी अंगिकारली पाहिजे. वर्तमानपत्राच्या वाचनाच्या सवयीमुळे व अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चौफेर होण्यासाठी मदत होते असे मत आकाशवाणीच्या निवेदिका तथा पत्रकार सौ अर्चना दिलीप शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसर रांगोळ्या,पताका, आंब्याच्या पानांची तोरणे , फुगे लावून सजवण्यात आला होता .या चैतन्यमय वातावरणात विद्यार्थ्यांचा विद्यारंभ संस्कार प्रारंभी पार पडला. प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर, कै. नाना पालकर व श्री सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पाटी पूजन केले. वंदना घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करताना भारतीय शिक्षण प्रसारक संस्था शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मापारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नूतन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि भरभरून प्रगती करण्यासाठी प्रयत्न करण्याची सवय लहानपणीच लावून घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा हिवंत यांनी केले. प्रास्ताविक सौ. श्रुती देशपांडे यांनी केले तर आभार सौ. शुभांगी सोनटक्के यांनी मानले. प्रमुख अतिथींचे स्वागत अध्यक्ष , मुख्याध्यापक व सौ. कल्पना कांबळे यांच्या हस्ते झाले.कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. नवीन वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांना औक्षण करून खाऊ देण्यात आला. पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा