शिक्षण क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू-सौ. अनूजाताई डोईफोडे
शिक्षण क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू-सौ. अनूजाताई डोईफोडे
..................
नांदेड दिनांक 2 जून प्रतिनिधी
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी झालेली निवड म्हणजे शिक्षणक्षेत्रामध्ये माझ्यावर जी जबाबदारी पडली आहे, त्याचा मी चांगल्या पद्धतीने उपयोग करेल व माझ्या हातून चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा दैनिक प्रजावाणी मधील ' मानसी' या महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिक सदराच्या कृतिशील संपादिका सौ. अनुजाताई शंतनू डोईफोडे यांनी व्यक्त केले.
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नांदेड शहरातील सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक प्रजावाणीच्या 63 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रजावाणीचे संपादक शंतनू सुधाकररावजी डोईफोडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते व माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, संगीत क्षेत्रातील चिंतनशील व निरपेक्ष भावनेने कार्यरत असणारे डॉ. प्रमोदराव देशपांडे , संत साहित्याचे अभ्यासक अनिल पांपटवार, प्रा. संतोष कुलकर्णी, शारदा संगीत महाविद्यालयाच्या संचालिका सौ. मंजुषाताई देशपांडे , अलकाताई पांपटवार, एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. डॉ. भाग्यश्री कापरे-कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अनुजाताई डोईफोडे म्हणाल्या,
कोव्हिडमुळे ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन झाले आहे, अश्या एकल कुटुंब असणाऱ्या महिलांसाठी आम्ही शासनाकडून तीन कोटी रुपयाचे अर्थसहाय्य त्यांच्या खात्यावर जमा केले. प्रत्येक महिलेला पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या चळवळीमुळे मिळाले. तळागाळातील एकल महिलांना त्यांच्या मुलांच्या बाल संगोपनासाठी त्यांना मिळालेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
यावेळी प्रा. डॉ. दीपक कासराळीकर सरांनी प्रजावाणीचे संस्थापक संपादक स्व. सुधाकररावजी डोईफोडे यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ व समाजहिताच्या पत्रकारितेचा गौरव केला. स्व. सुधाकरराव डोईफोडे यांच्या अभ्यासू पत्रकारितेचा वारसा व परंपरा संपादक शंतनू डोईफोडे समर्थपणे पुढे चालवत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात दैनिक प्रजावाणीचे नाव मराठवाड्यात व महाराष्ट्रात आदराने घेतले जाते. दैनिक प्रजावाणी वाचल्याशिवाय नांदेडकरांची सकाळ जात नाही. इतर वर्तमानपत्रे वाचली तरी दैनिक प्रजावाणी वाचला नाही तर वाचकांना काहीतरी अर्धवट राहिल्यासारखे वाटते. मानसी पुरवणीच्या संपादिका अनुजाताई डोईफोडे यांनी दर्जेदार साहित्य चिंतनशील व अभ्यासू स्त्री लेखिकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून महिलांना व्यक्त होण्यांसाठी एक समर्थ व्यासपीठ उभे केले आहे असे सांगून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
यावेळी पत्रकार प्रा संतोष कुलकर्णी यांनीही दैनिक प्रजावाणीच्या गौरवशाली पत्रकारितेच्या परंपरेचा व स्व. सुधाकररावजी डोईफोडे यांनी केलेल्या मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न, सिंचन, पाणी प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, मराठवाड्याच्या विकासाचे प्रकल्प ई. च्या पाठपुराव्याचा व सडेतोड पत्रकारितेचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पांपटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.प्रमोद देशपांडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा