शासनाची भूमिका माय-बापाची असावी
प्रा.लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने बघावे- पंकजा मुंडेंचे ट्विट
शासनाची भूमिका माय-बापाची असावी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.अशा प्रकारचे ट्विट भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारचे लक्ष वेधले आहे.आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला.
"राज्याचे शासन आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते म्हणताय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही याचं आम्हाला राज्य शासनाकडून लेखी प्रमाणपत्र पाहिजे. ओबीसींना कळत नाही असं शासनाने समजू नये. आमचा समाज शांती प्रिय आहे, आम्ही सामाजिक तेढ निर्माण करत नाही," असे लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.
तसेच "जरांगे साहेब गेली सात- आठ महिने सांगत आहेत की ओबीसी आमचा भाऊ आहे आमच्यात भाईचारा दुसरीकडे ते ओबीसी नेत्यांना ते टार्गेट करताना दिसतात. मनोज जरांगेंना शासनामार्फत रेड कार्पेट अंथरले जाते. मात्र आम्ही उपोषण करतो तेव्हा शासनाकडून साधी दखलही घेतली जात नाही. हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का?" असा सवालही लक्ष्मण हाके यांनी विचारला.
दरम्यान, आज खासदार संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. मात्र लक्ष्मण हाके आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगावं आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया हाकेंनी दिली. उद्या लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासासाठी मुंबईला जाणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा