पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष
पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष
परळी वैजनाथ ता.१२ (प्रतिनिधी)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाच्या वतीने विधानपरिषदेवर उमेदवारी घोषित करण्यात आली होती. शुक्रवारी (ता.१२) झालेल्या मतदानात विजयी झाल्याबद्दल शहरात विविध ठिकाणी गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करत स्थानिक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून त्यांचे पक्षाच्या वतीने पुर्नवसन करा अशी मागणी समर्थकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. पंकजा मुंडे यांचे राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणूक वेळोवेळी संभाव्य यादीत नाव येत होते. पण पाच वर्षांत काही नंबर लागला नाही. यामुळे पक्षाने लोकसभेच्या निवडणूकीत डॉ प्रितम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर महाराष्ट्रातील समिकरणे बघता व ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्न तसेच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना पद देणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन केंद्रीय पातळीवर पंकजा मुंडेसह पाच जणांना विधानपरिषदेत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या मतदानत पंकजा मुंडे या २६ मते घेऊन विजयी झाल्या. यावेळी भाजपसह व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीच्या वतीने शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक, पंकजा मुंडे यांचे यशश्री निवासस्थान, धनंजय मुंडे यांचे जगमित्र कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळून व पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा