ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प
ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प
अनेक भागात रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्यही मिळत नसल्याने, गरिबांचे हाल होतायत.स्वस्त धान्य योजनेतील धान्य ग्राहकांना देण्यासाठी वापरण्यात येणारे ई-पॉस मशीनचे सर्व्हर तांत्रिक समस्येमुळे बंद आहे. त्यामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी ग्राहकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर थंब द्यावा लागत आहे. परंतु, आठवडाभरापासून सर्व्हरच डाऊन असल्याने ग्राहकांना दुकानात चकर माराव्या लागत आहेत.तालुक्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोरजी यंत्रणा असलेल्या ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. टू जी नेटवर्क असलेल्या मशीन बदलून फोरजी नेटवर्कच्या मशीन दिल्या आहेत. मात्र, महिनाभरापासून यामध्ये अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करा
सद्यःस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातच ई-पॉस मशीनला सर्व्हरमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे धान्याचे नियतन बऱ्याच ठिकाणी थांबले आहे. यामुळे धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करावी व शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
ई-केवायसीला मुदतवाढ द्यावी
स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनला सर्व्हर डाऊन अभावी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ई -केवायसीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. याशिवाय जुलै महिन्याचे धान्य वाटपही रखडले आहे. यामुळे या महिन्यात धान्य मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात ते धान्य दिले जावे, अशीही मागणी होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा