श्रावणी वेदप्रचार सप्ताह
स्वर्ग व नरकाविषयी वेदांचा विशुद्ध दृष्टिकोन आचरणात आणावा !
श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य ज्ञानप्रकाशजी
परळी वैजनाथ, दि.१५-
जगात स्वर्ग व नरक हे दोन्ही या भूतलावरच असून त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात परंपरागत भ्रामक व मिथ्या कल्पना पसरल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. स्वर्ग व नरकाविषयी वेदांचा विशुद्ध दृष्टीकोन आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुखी ठरते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाश शास्त्री यांनी केले.
येथील आर्य समाजात कालपासून सुरू झालेल्या श्रावणी वेदप्रचार सप्ताहाच्या रात्रकालीन ज्ञानसत्रात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान स्वामी विद्यानंद सरस्वती हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनात श्री शास्त्री म्हणाले की सध्या समाज अविद्या व अंधश्रद्धांनी ग्रासलेला आहे. स्वर्ग व नरकाच्या भ्रामक कल्पनामुळे समाजात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ज्ञानपूर्वक सत्कर्मांनी सुखी होणे म्हणजे स्वर्ग तर अज्ञानपूर्वक दुष्कर्मांनी दुःखी होणे म्हणजेच नरक होय. म्हणूनच सुखविशेष स्वर्गाच्या प्राप्तीसाठी मानवाने वेदज्ञानाचा आश्रय घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आपल्या कुटुंबात सुख व शांतता कशी नांदावी, याविषयी आचार्य भर्तृहरी यांच्या श्लोकाच्या आधारे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वेदप्रचारक पं. भूपेंद्रसिंह आर्य व पं. लेखराज शर्मा यांनी आपल्या मधुर भजनसंगीताच्या माध्यमाने व्यक्ती, कुटुंब समाज व देशाच्या उन्नतीसाठी सत्यज्ञानाचा आश्रय घेण्याचे आवाहन केले.
यावेळी शतायुषी तपस्वी संन्यासी स्वामी सोमानंद सरस्वती, डॉ. ब्रह्ममुनिजी, श्रद्धानंद गुरुकुलाचे आचार्य श्री सत्येंद्रजी, संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया सचिव उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, लक्ष्मण आर्य गुरुजी, डॉ. मधुसूदन काळे, जयपाल लाहोटी, प्रशांतकुमार शास्त्री, रमेश भंडारी, लिंबाजी कदम, गोवर्धन चाटे, डॉ. विश्वास भायेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा