एसटी बसमधील चक्रावून टाकणारा प्रकार
एसटी बसमधील चक्रावून टाकणारा प्रकार :गुंगीचे औषध देऊन साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने महिलेच्या अंगावरून काढून घेतले
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा:- गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याची चक्रावून टाकणारी घटना एसटी प्रवासात घडली आहे. परळी नांदेड बस मध्ये एका अज्ञात इसमाने बिस्किट व पाण्याच्या माध्यमातून गुंगी येण्याचे औषध देऊन तीन लाख 60 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, कमलबाई ज्ञानोबा सुरवसे रा. बसवेश्वर कॉलनी, परळी वैजनाथ ह्या बसस्थानक परळी येथुन नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसुन नांदेडला जात होत्या. दगडवाडी फाट्याच्या जवळ शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना बिस्कीट व पाणी खाण्या पिण्यासाठी दिले. कमलबाई कदम यांनी हे बिस्किट व पाणी पिल्याने त्यांना गुंगी आली. याच दरम्यान अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील 5 तोळे वजणाच्या सोन्याच्या 2 पाटल्या व एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण ३,६०,०००/ (तीन लाख साठ हजार रुपये) सोन्याचे दागीणे काढुन घेवुन पोबरा केला. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात कमलबाई सुरवसे यांच्या फिर्यादीवरून एका अनोळखी इसमाविरुद्ध गु. र. नं. 124/ 2024 कलम 318(4),319(2)बी.एन.एस. भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.नागरगोजे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा