बीड एसीबीची कारवाई
एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला!
मुरुमाचे उत्खनन कमी दाखवण्यासाठी स्विकारली लाच, बीड एसीबीची कारवाई
बीड, : अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात झालेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकार्याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली, तडजोडअंती दीड लाख ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.21) दुपारी मंडळ अधिकार्यास रंगेहाथ पकडले. बीड एसीबीने केलेल्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
सचिन भागवत सानप (वय 39, रा.एमएसजी अपार्टमेंट, जुनानगर नाका, बीड) असे बीड शहरच्या लाचखोर मंडळ अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या नातेवाईकांसह इतरांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात अवैध मुरुम उत्खनन संदर्भात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्या संदर्भात मंडळ अधिकारी सानप याने बीड तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक 49 मधील मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता. नमुद पंचनाम्यात एक हजार ब्रास ऐवजी 500 ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सानपने पंचसमक्ष दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून आजच एक लाख रुपये स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव, बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, सुदर्शन निकाळजे, अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा