तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेतीवरील विस्तृत मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा

 परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव : तिसऱ्या दिवशीही राज्यभरातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेतीवरील विस्तृत मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा


दर महिन्याला नोकरदाराप्रमाणे पैसा देणारी रेशीम शेती; शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करावा - महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम, नागपूर


परळी वैद्यनाथ (दि. 23) - परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज देखील राज्यभरातून शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी याठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. गडचिरोली, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, रायगड ते अगदी कोल्हापूर पासून या प्रदर्शनास शेतकरी बांधवानी उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. 


कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध कृषी उत्पादने व उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या स्टॉल्स वर खरेदीसाठी पुरुषांसह महिलांची देखील मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. 


तांत्रिक सत्रात रेशीम शेतीवर मार्गदर्शन


बदलत्या व असंतुलीत हवामानात शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने रेशीम शेती हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. तुती, रेशीम कीटकांचे जीवनचक्र, खाद्य, कीड व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण इत्यादी बाबी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास रेशीम शेती नगदी उत्पन्न देते. नोकरदारांना दर महिन्याला पगार असतो, त्याच पद्धतीने रेशीम शेतीतून दर महिन्याला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे, असे मत नागपूर रेशीम उपसंचालक श्री महेंद्र ढवळे यांनी आज कृषी महोत्सवात आयोजित तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. 


यावेळी शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा काडी पासून माडी व माडी ते गाडी असा उन्नत प्रवास दाखवणारी चित्रफीतही दाखवण्यात आली. महाराष्ट्रात बीड जिल्हा हा रेशीम शेतीत प्रथम स्थानावर असून एकूण रेशीम उद्योगाच्या 40% वाटा हा एकट्या बीड जिल्ह्याचा आहे. यावेळी परळी तालुक्यातील दौनापूर गावचे प्रगतशील शेतकरी अरविंद आघाव, मलनाथपुरचे बाबा सलगर यांच्या रेशीम शेतीतील यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या. बीडच्या लोळदगावाचे कृषी भूषण शिवराम घोडके व रामप्रसाद डोईफोडे यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याच्या पद्धती व फायदे यावर मार्गदर्शन केले. 


चर्चा सत्रास अध्यक्ष स्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे सेंद्रिय शेती संशोधन विभागाचे अन्वेषक डॉ.आनंद गोरे, रेशीम शेती संशोधन केंद्राचे डॉ.चंद्रकांत लटपटे, कृषी विज्ञान केंद्र खामगावच्या डॉ.दीप्ती पाटगावकर,  कृषी विद्यावेत्ता डॉ.वसंत सूर्यवंशी, डॉ.रमण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांसह आदी उपस्थित होते.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार