भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक महासभा

 भाशिप्र संस्थेच्या वार्षिक महासभेतून संस्थेच्या ध्येय धोरणांची उजळणी होते - हरीश कुलकर्णी




अंबाजोगाई/प्रतिनिधी...

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक महा सभेतून संस्थेच्या ध्येयधोरणांची उजळणी होते. ही संस्था सामूहिक नेतृत्वाच्या आधारे सुसूत्र पद्धतीने चालविली जाते. लोकांधारावर आधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्याकडे आता शिक्षण संस्थांनी पाहायला हवे. सुजाण नागरिकांची जडणघडण व चांगल्या समाजाची निर्मिती करत असताना हिंदूधर्म एकसंघ राहावा यासाठी भविष्यात सर्वांना काम करावे लागणार असल्याचे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे कार्यकारणी सदस्य हरीशजी कुलकर्णी यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईच्या वार्षिक महासभेच्या वेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

अंबाजोगाई येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक महासभेला केंद्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची सर्व संस्था सभासदांची व संस्थेच्या सर्व संस्कार केंद्राच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. स्थानिक खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजय वालवाडकर, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामभाऊ कुलकर्णी, कार्यवाह किरणदादा कोदरकर, प्राचार्य मुकुंद देवर्षी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

पुढील वर्षी संस्थेला 75 वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले संघ कार्यकर्ते व शिक्षक कार्यकर्ते यांची भविष्यामध्ये जबाबदारी  निश्चितच वाढलेली आहे . संस्थेच्या सर्व सभासदांना व शिक्षक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पुढील वर्षांमध्ये नेमकेपणाने काय करायचे आहे याची दिशा वार्षिक महासभेतून मिळते. सामूहिक जबाबदारीतून यशस्वीतेकडे  वाटचाल करणारी भाशिप्रची कार्यसंस्कृती असल्यामुळे शैक्षणिक प्रश्नांची उकल आपल्याला आपल्याच कामामधूनच करावी लागणार आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची अमृत महोत्सवी वर्षाकडे होत असलेली वाटचाल पाहता भविष्यामध्ये सामाजिक उपक्रमांची सांगड, सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची सजगवृत्ती यांचा समन्वय साधावा लागणार आहे. 

पदर खोस, पदर मोड " कर म्हणजेच कणखरता ठेवत लोककल्याणासाठी झळ सोस असं वागावे, "पदर पसरू नको" हा थोरा मोठ्यांचा संदेशाचे पालन ,राष्ट्र आणि राज्य ही स्पष्ट संकल्पना, अस्मिता जागृत - तेवत ठेवण्यासाठी मंदिराचा जिर्णोद्धार करणारी, 300 वर्षांपूर्वीची एक कर्तृत्ववान महिलेने प्रस्थापित केलेल्या सुशासन आणि अचूक न्याय पद्धतीचे कौतुक इंग्रजांना देखील होते अशा "अहिल्यादेवी होळकर" यांची त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्ताने त्यांची महती संस्था सभासद, शिक्षक ,विद्यार्थी, पालक वर्गात झाली पाहिजे आणि त्यांचे हे कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचवता आहे आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या कार्याचे मूल्यांकन समाज डोळसपणे करत असल्यामुळे आपण जबाबदारीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिक्षक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मिशनरी वृत्तीतून काम केले तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टीने आपण भरीव काम करू. राष्ट्राच्या भविष्याचा आधार सामान्य माणूस असल्यामुळे व सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणारी आपली शैक्षणिक संस्था असल्यामुळे आपल्या कामाची वारंवारिता सातत्याने समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेकडे सक्षम, ध्येयसमर्पित कार्यकर्त्यांची मोठी टीम असल्यामुळे 75 वर्षाचा टप्पा पूर्ण करत असताना भविष्याचा ही वेध आपल्याला घ्यावा लागणार आहे. लोकाधारावर आधारित शिक्षण संस्था आपल्याला विकसित करावी लागणार आहे असे हरीश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यातून आम्ही सर्व पदाधिकारी विश्वस्त या भावनेतून काम करतो. शैक्षणिक काम करत असताना निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उकल आपल्या सर्वांना करावी लागते. त्यावेळी खरा कस लागतो. ती आपल्या सर्वांची कसोटी असते. संस्थेची कार्यपद्धती हेच संस्थेचे खरे वैशिष्ट्य आहे. बहुमतापेक्षा सहमती हीच संस्थेची कार्यसंस्कृती आहे. सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्था कटिबद्ध आहे.संस्था आगामी वर्षात अमृत महोत्सवी वाटचाल करणार असून  सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठीचा संस्थेचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे.  मनुष्या प्रमाणेच  संस्थेच्या वाढत्या वयोमानात अनुभवातून निर्णयाची देखील योग्य गती येत असते, 75 व्या वर्षात विविध अभ्यासक्रम, स्वतःच्या शाळा इमारती परिपूर्ण होतील असा वाटचालीबाबतचा ठाम विश्वास आणि संकल्प त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्ताने संस्था सर्व संस्कार केंद्रामध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक  कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 मागील वार्षिक महासभेचा वृत्तांत व चालू शैक्षणिक वर्षाचा अहवाल संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी सादर केला. तसेच संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी शैक्षणिक ठराव मांडले. उपस्थित सर्व सभासदांनी एकमतांनी या सर्व ठरावांना अनुमोदन दिले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी उत्तरे दिली. बीड येथील पूर्णवादी बँकेचे नूतन अध्यक्ष सुभाष जोशी, लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या केंद्रीय कार्यकारीचे सदस्य प्रवीण सरदेशमुख यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणीचे सदस्य अमरनाथ खुर्पे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार