परळीतील गित्ते दाम्पत्यांनी साजरा केला गोमातेचा डोहाळजेवण कार्यक्रम
परळीतील गित्ते दाम्पत्यांनी साजरा केला गोमातेचा डोहाळजेवण कार्यक्रम
नातेवाईक, मित्रमंडळी सह गल्लीतील ४०० लोकांना दिले जेवण
परळी वै. ता.२६ प्रतिनिधी
आपण नेहमीच कुणीतरी आपल्या लेकीचे, सुनाचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करुन त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला असे आपण ऐकतो. मात्र परळी शहरात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने चक्क आपल्या गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रविवारी (ता.२५) मोठ्या उत्साहात साजरा करून जवळपास ३०० ते ४०० आप्तस्वकीय, नातेवाईक, परिसरातील नागरिकांना डोहाळे कार्यक्रमानिमित्त जेवण दिले. ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील जलालपुर जवळील आयोध्या नगर भागात दत्ता रामकिशन गित्ते नावाचे अल्पभूधारक युवक शेतकरी राहतात. रामकिशन गीत्ते यांचे शहरालगतच ब्रम्हवाडी शिवारात जवळपास अडीच एकर शेत आहे. गीत्ते यांना लाल कंधार जातीची एक गाय आहे ही गाय प्रथम गर्भवती झाली असून तिला नऊ महिन्याचा गर्भ आहे. ह्या प्रकाराने शेतकरी दत्ता रामकिशन गीत्ते अत्यंत खुष झाले आणि चक्क त्यांनी रविवारी (ता.२५) आपल्या गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले. त्याचे निमंत्रण आप्तेष्ट, नातेवाईक व परिसरातील मित्रमंडळींना देण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपले नातेवाईक यांना देखील बोलावले आणि ज्याप्रमाणे मुली किंवा सुनाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतो त्याचप्रमाणे आपल्या गाईचा डोहाळे कार्यक्रम साजरा केला. प्रथे प्रमाणे त्यांनी सहकुटुंब आपल्या गाईस सजवले आणि साडीचोळी देऊन तिची ओटी देखील भरली. थाटात साजरा करण्यात आलेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी दत्ता रामकिशन गित्ते यांनी आपले आप्तस्वतीय, नातेवाईक आणि परिसरातील जवळपास ४०० ते ५०० नागरिकांना डोहाळे कार्यक्रमाचे जेवण दिले. ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे शहरात कौतुक होत असून दत्ता रामकिशन गीत्ते यांचे अभिनंदन होत आहे. यासाठी दत्ता गीत्ते यांची पत्नी विजयमाला, वडील रामकिशन गीत्ते व आई मुद्रीकाबाई गीत्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. नविनच झालेल्या कार्यक्रमाची शहरभर कुतुहलाने चर्चा करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा