● असा उलगडला गुन्हा... पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांच्या पुर्वानुभवाने सापडला चोर
बसमध्ये बिस्कीट आणि पाणी देऊन आणली गुंगी: महिलेचे साडेतीन लाखाचे दागिने पळवणारा चोर जेरबंद !
परळीच्या संभाजीनगर पोलीसांनी महिनाभरात उलगडला चोरीचा गुन्हा
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ येथून बस मध्ये प्रवास करत असताना दगडवाडी जवळ बसमधील एका महिलेला एका अनोळखी इसमाने चहा बिस्कीट दिले. त्यानंतर या महिलेला गुंगी आली. त्यानंतर या इसमाने महिलेच्या अंगावरील साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळून नेल्याची घटना गेल्या आठ ऑगस्ट रोजी घडली होती. या अतिशय गुंतागुंतीच्या व तपासाच्या दृष्टीने क्लिष्ट असलेल्या गुन्ह्याचा परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी महिन्याच्या आत तपास केला व हा गुन्हा उलगडला असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका चोराला मुददेमालासह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार कमल ज्ञानोबा सुरवसे वय 50 वर्ष रा. बसवेश्वर कॉलनी परळी ता. परळी जि.बीड महिला दि.-08/08/2024 रोजी सकाळी 7:30 वा च्या सुमारास परळी बसस्थानक येथून नांदेड येथे जाण्यासाठी परळी ते नांदेड बस मधून प्रवास करत असताना बसमध्ये एका अनोळखी इसमाने या महिलेला बिस्कीट आणि पाणी दिले. पाणी पील्यानंतर तिला चक्कर आली व गुगीत आल्यावर चोरट्यांनी तिच्या हातातील दागिने असा 3,60,000/- किंमतीचा मुददेमाल काढून घेवून फसवणुक केली. अशा प्रकारचा गुन्हा पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी जि.बीड येथे गुरनं 124/2024 कलम 318(4), 319 (2) बीएनएस 2023 प्रमाणे दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास वेगाने करत संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी परळी शहरात नवीन अद्यावत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे फुटेजच्या आधारे, तसेच सायबर सेल बीड यांची तांत्रिक मदत घेवून गुन्हयातील अनोळखी आरोपी अमोल धोंडीबा मस्के वय 50 वर्ष रा. बोधेगाव ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर याचा शोध लावला. आरोपी निष्पन्न करून या आरोपीकडून 3,50,000/- रूपये किंमतीचा सोन्याचा मुददेमाल हस्तगत केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनजंय ढोणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे साहेब, पोह नरहरी नागरगोजे, पोकॉ व्यंकट डोरनाळे, पोकॉ भगवान चव्हाण, पोकाॅ. शंकर डोंगळे आदींनी गुन्ह्याचा उलगडा करण्याची कामगिरी केली.
● असा उलगडला गुन्हा... पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांच्या पुर्वानुभवाने सापडला चोर
दरम्यान तपासाच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीची व क्लिष्ट अशा प्रकारची चोरीची ही घटना होती. मात्र संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कामात अनुभवी असलेले पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांनी या गुन्ह्यात तत्परतेने तपास केला. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे डीबी इन्चार्ज नरहरी नागरगोजे यांनी काही काळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे. अशा प्रकारच्या घटना मधील जुन्या काही आरोपींबाबत त्यांना माहिती होती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला.त्यामुळे या घटनेतील आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले. या घटनेत आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्यापर्यंत पोहोचत त्याची सखोल तपासणी केली.त्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून संभाजीनगर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. डीबी इंचार्ज नागरगोजे यांचा अनुभव व अन्य सर्व दुवे एकत्र जुळवत एक महिन्याच्या आत गुंतागुंतीचा गुन्हा उलगडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा