निकटवर्तीयांना चुटपुट लावणारी ह्रदयद्रावक घटना

आईच्या दहाव्या दिवशी मुलाचीही संपली जीवनयात्रा !


परळी/प्रतिनिधी - आईच्या दहाव्या दिवशीच मुलाचेही निधन झाल्याची चुटपूट लावणारी एक घटना परळीच्या संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्लीमध्ये शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी घडली. तारामती लक्ष्मण शिंदे (वय ८०) व बालाजी लक्ष्मण शिंदे (वय ५३), असे निधन झालेल्या माय-लेकराचे नाव आहे. बालाजी शिंदे हे गणेशपार भागात *बम्बईया* या टोपण नावाने परिचित होते. स्कूल ऑटो चालक म्हणून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते व्यवसाय करत होते. ऊन-पाऊस अथवा कितीही कडाक्याची थंडीही असली तरी पहाटे ५ वाजून ५ मिनिटाला शिंदे यांचा ऑटो सुरू व्हायचा. तीच त्यांची ओळख गल्लीतील रहिवाशांमध्ये ठसलेली होती. ऑटो चालवूनच त्यांनी मुलाला इंजिनिअर केले. मुलीलाही उच्चशिक्षित केले. बालाजी शिंदे हे ४ सप्टेंबरला वार्धक्याने इहलोकीची यात्रा संपवलेल्या आईच्या गंगापूजनाचे विधी १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याची सर्व तयारी घरात करत होते. १४ व्या चा गोड जेवणाचा मुख्य विधी सावता महाराज मंदिरात करायचे निश्चित झाले होते. तसे स्थळ, वेळ सांगणाऱ्या छापिल मजकुराच्या व्हॉट्सॲप पत्रिकाही नातेवाईक, आप्त-स्वकीय, मित्रमंडळींना त्यांनी पाठवल्या होत्या. दरम्यान, नवव्या दिवशी बालाजी शिंदे यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. मित्र-परिवाराने त्यांना तातडीने परळीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. हृदयविकाराच्या संदर्भाने उपचार करण्यात आले. प्रकृतीत गुंतागुंत वाढत असल्याचे पाहून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले. तेथे रात्री आणि दिवसभर उपचार सुरू ठेवले. मेंदूत रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी बालाजी शिंदे यांची प्राणज्योत मालवली. परळीत शनिवारी सकाळी १० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात, पत्नी, इंजिनिअर मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, बहीण, दाजी असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार