राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!
अतिक्रमणांचा विळखा, न.प.चा अंधाधुंद कारभार व फसलेली भुयारी गटार योजना यामुळे परळीत घुसले पाणी : सखोल चौकशी करा- ॲड. जीवनराव देशमुख
परळी वै., प्रतिनिधी...
सरस्वती नदीवरील वाढलेली अतिक्रमणे व नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेली अर्धवट व फसलेली भुयारी गटार योजना यामुळे सर्वत्र पाणी तुंबून बसत आहे.रस्ते खोदलेले,नाल्या अर्धवट,गटारांची कामे पूर्ण नाहीत यामुळेच परळीकरांना अनेक वर्षापासून फसव्या विकासाच्या नावाखाली त्रासून टाकलेले आहे.नगर परिषदेचा भोंगळ कारभार व कोट्यावधी शासकीय निधी गिळून टाकण्यासाठी राबवलेली व फसलेली भुयारी गटार योजना याची सखोल चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून परळी शहराच्या जुन्या भावभागातून वाहत असणाऱ्या सरस्वती नदीचे पात्र कमी कमी होत गेले आहे. या पात्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे व नदीपात्रात झालेल्या बांधकामामुळे नदीपात्र कमी झाले असून या नदीला नाल्याचे रूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत नसल्याने गेल्या सात आठ वर्षात याची जाणीव झालेली नव्हती मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि सरस्वती नदीने रौद्ररूप धारण केले व नागरिक वस्त्यांमध्ये हे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली.तसेच परळी नगर पालिकेला भुयारी गटारमधून पाण्याचे शुध्दीकरण करुन वाया जाणारे पाणी प्रक्रिया करुन वापरण्यासाठी भुयारी गटार योजनेसाठी 150 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. या निधीचा वापर हा गैरमार्गाने झालेला आहे.अद्याप भुयारी गटार योजनेमुळे परळी शहरातील पुर्ण रस्ते हे फोडलेले असून कोठेही भुयारी गटारातून पाणी जात नसल्याची स्थिती आहे याची सखोल चौकशी करावी.
सरस्वती नदी ही शहरातील नागरी वस्त्यांमधून जाते. या नदीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. नगरपालिकेच्या वतीने सातत्याने या नदी पात्राची स्वच्छता करणे, त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी यातील गाळ काढून घेणे ही कामे होणे गरजेचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सरस्वती नदीला आठ वर्षांत पहिलाच पूर आल्यानंतर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरून दाणादाण उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.परळी नगर परिषदेच्या अंदाधुंद कारभाराची व विविध विकासकामांना देण्यात आलेल्या शासकीय निधीचा वापर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा