तीन हजारात सुरू केला छोटा व्यवसाय अन् पंधरा दिवसात बारा हजारांची कमाई

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तीन हजारांतून गृहिणीचे 'स्टार्टअप' !


तीन हजारात सुरू केला छोटा व्यवसाय अन् पंधरा दिवसात बारा हजारांची कमाई


परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....

          आपल्याकडे एक म्हण आहे 'कर भला, तो हो भला' या न्यायाप्रमाणे उपलब्ध साधनांचा उपयोग करत व्यक्ती काही ना काही करू शकतो. याचे उदाहरणच परळीतील एका गृहिणीने घालून दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या तीन हजार रुपयांचा विनियोग फिजूल खर्च करून न करता त्याचाच भागभांडवल म्हणून उपयोग करत एका गृहिणीने घरी बसून छोटासा व्यवसाय सुरू केला.विशेष म्हणजे पंधरा दिवसात केवळ 3000 रु.गुंतवणुकीवर या छोट्या व्यवसायातून तिने बारा हजार रुपये कमविले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अतिशय सकारात्मक परिणाम व एक चांगले उदाहरण या निमित्ताने परळीतून पुढे आले आहे.

         राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यात माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.या योजनेच्या निमित्ताने संपूर्ण महिलावर्गाचे जनजीवन प्रभावित झाल्याचे बघायला मिळाले आहे. या योजनेचे दोन हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमाही झाले आहेत. लवकरच तिसरा हप्ताही जमा होणार आहे.राखी पोर्णिमा ते गौरी गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर प्रत्येक गृहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे 'लाडक्या बहिणी खुश झाल्याचे दिसून आले. या योजनेच्या पैशांवरून सोशल मीडियावर  अनेक साधक ,बाधक, रंजक अशा चर्चा सुरू आहेत.यावर विनोदी व मिश्किल टिप्पण्याही होत आहेत मात्र या योजनेचा रचनात्मक, चांगला व सकारात्मक परिणामही झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशाच प्रकारचे एक उदाहरण परळी शहरात बघायला मिळाले आहे.

          परळी वैजनाथ शहरातील नेहरू चौक( तळ) भागातील गृहिणी असलेल्या अक्षरा अक्षय शिंदे यांनी अगदी सुरुवातीलाच मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज केला. त्यांना या योजनेतील दोन हप्त्याची 3000 इतकी रक्कम खात्यात प्राप्तही झाली. मात्र या पैशाचा विनियोग आपण इतरत्र करायचा नाही असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. आपल्या खात्यात जमा होणारे पैसे आपण कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वापरायचे असा त्यांनी निश्चय केला.  मात्र काय करायचे? हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला. काही दिवसांवरच गौरी गणपती उत्सव येणार होता. त्यामुळे आपल्याकडे असलेले कौशल्य वापरून आपण सजावटीची कृत्रिम झाडे तयार करावी व विकावी असा विचार त्यांनी केला. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाचीही आवश्यकता नव्हती.आपली थोडीशी मेहनत व वेळ दिला तर हा व्यवसाय सुरू होऊ शकतो अशी खूणगाठ त्यांनी बांधली.

● केवळ तीन हजारांचे भांडवल....

      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जमा झालेले तीन हजार रुपये भाग भांडवल म्हणून त्यांनी आर्टिफिशियल झाडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी केले. अतिशय आकर्षक व सजावटीच्या दृष्टीने सर्वांना उपयोगी पडणारी अशी कृत्रिम झाडे त्यांनी तयार केली. ओळखी-पाळखीच्या व संपर्कातील लोकांना आमच्याकडे सजावटीची झाडे विक्रीला असल्याचे कळवले.बघता बघता त्यांच्या या सजावटीच्या कृत्रिम झाडांना ग्राहक मिळू लागले.मागणी वाढली. ही कृत्रिम झाडे तयार करण्यासाठी त्यांना अधिकचा वेळ द्यावा लागू लागला.या कामात त्यांच्या सासुबाई यांनीही त्यांना मदत केली. केवळ परळीच नाही तर गंगाखेड, सोनपेठ,परभणी येथूनही त्यांनी तयार केलेल्या या झाडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. केवळ पंधरा दिवसात तीन हजार रुपये गुंतवून सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय व  त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहून हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर आपण सुरू करायचा असा विचार अक्षरा शिंदे यांनी केला आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 3000 रु. पासून या गृहिणीने आपल्या या छोट्या व्यवसायाचे स्टार्टअप करून केवळ पंधरा दिवसात त्यांनी बारा हजार रुपयांची कमाई केली असल्याचे सांगितले.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेचा असाही एक सकारात्मक व महिला सशक्तीकरणाच्या बाबीत अतिशय चांगला परिणाम या निमित्ताने दिसून आला आहे.

● दिडशे ते दोनशे रुपयांपर्यंत विक्री....

      महालक्ष्मीच्या सणाला महालक्ष्मी समोर आरास करण्यासाठी सजावट म्हणून या कृत्रिम झाडांना मोठी मागणी आली. ग्राहकांच्या विशेषतः महिला वर्गाच्या पसंतीला ही झाडे उतरली. त्यामुळे माझ्या या छोट्याशा व्यवसायाला महिला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत या झाडाची विक्री झाली. त्यामुळे खर्च वजा जाता माझी 15 दिवसात 12 हजार रुपयाची कमाई झाली. यापुढे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला विचार असल्याचे अक्षरा शिंदे यांनी सांगितले.

● व्यवसायाची प्रेरणा व दिशा मिळाली...

           मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपल्या स्वतःच्या खात्यात तीन हजार रुपये आल्यामुळे या तीन हजार रुपयांतून आपण काय करू शकतो. हा विचार मनात आला आणि यामधून मला व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून प्रयत्न केला. या प्रयत्नांना यशही मिळाले. त्यामुळे घरी बसून सहज सुरू केलेला हा छोटा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर सुरू करावा याची दिशा मला मिळाली आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणाने सजावटीची कृत्रिम झाडे तयार करण्याचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा माझा मानस आहे

-सौ.अक्षरा अक्षय्य शिंदे

व्यावसायिक गृहिणी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार