कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन
बियाणे समिती : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उपससमितीच्या सदस्यपदी गोविंद देशमुख, विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची निवड
कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन
मुंबई दि 8 ऑक्टोबर 2024-:
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी आणि फलोत्पादन बियाणे उपसमितीच्या सदस्यपदी परळी वैजनाथ येथील गोविंदराव देशमुख, ऍड.विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या पदाधिकाऱ्यांची शिफारस केली होती.
केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालया अंतर्गत केंद्रीय बियाणे समिती कार्यरत असते. ही समिती राज्यनिहाय उपसमित्यांची नेमणूक करते. बियाणे कायदा, 1966 च्या अंमलबजावणीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणे, राज्यातील बियाणे कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि राज्य सरकार/केंद्रीय बियाणे समितीला नियतकालिक अहवाल पाठवणे, राज्य बियाणे चाचणी प्रयोगशाळेची तपासणी करणे आणि बियाणे कायद्यांतर्गत राज्य बियाणे चाचणी प्रयोगशाळा म्हणून घोषित करण्यासाठी तिच्या योग्यतेचा अहवाल राज्य सरकारला देणे, बियाणे कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन देणे, राज्यासाठी पिकांच्या नवीन जाती घेण्याचा विचार करणे, राज्यात नव्याने प्रसिद्ध झालेल्या वाणांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे ही या समितीचे प्रमुख कार्य आहेत. या उपसमितीचे मुख्यालय मुंबई येथे असणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सचिव या समितीच्या अध्यक्ष आहेत. तर कृषी आयुक्त, बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक आणि कृषी विभागाशी संबंधित विविध उपक्रमांचे पदाधिकारी हे सदस्य आहेत.
नवनियुक्त तीनही पदाधिकाऱ्यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व आ.पंकजाताई मुंडे यांसह माजी आ.संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
बियाणे समितीवरील तीनही पदाधिकाऱ्यांबद्दल......
गोविंदराव देशमुख हे परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असून अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी सभापती आहेत, याशिवाय परभणी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. कृषी पदवीधर असलेले गोविंदराव देशमुख हे प्रगतशील आधुनिक शेतकरी असून शेती विषयक जाणकार आहेत.
ऍड.विष्णुपंत सोळंके हे परळी तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी असून अंबाजोगाई येथील न्यायालयात ते वकिलीची प्रॅक्टिस करतात. मागील वीस वर्षापासून ते कॉटन फेडरेशनचे संचालक आहेत तसेच उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेले होते. ते स्वतः कृषी उद्योजक असून कापूस जिनिंग सारखे कृषिपुरक उद्योग त्यांनी उभे केलेले आहेत. कापूस बियाण्यांचे उत्तम अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे.
अतुल मुंडे हे परळी खरेदी-विक्री संघाचे संचालक असून, मुंडेंच्या जन्मगाव नाथरा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व मागील पंधरा वर्षांपासून संचालक आहेत. तरुण वयात आधुनिक पद्धतीने प्रगतिशील शेती करणारे शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.
धनंजय मुंडे यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गोविंदराव देशमुख ऍड विष्णुपंत सोळंके तसेच अतुल मुंडे यांनी श्री.धनंजय मुंडे व कृषी विभागाचे आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा