मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
पुणे, प्रतिनिधी...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा उषा तांबे आणि कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधिंची महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना होती.बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावर्षी संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत होती. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते.हे संमेलन दि 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन दुपारी चारवाजता होणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नामवंताची मुलाखत होणार आहे. या संमेलनात देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन, मराठीचा अमराठी संसार, परिचर्चा "आनंदी गोपाळ' या पुस्तकावर, अनुवादावर परिसंवाद, मधुरव हा विशेष कार्यक्रम आदी विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच बहुभाषिक कविसंमेलन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असल्याचे प्रा. तांबे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा