भाजपचे हिंदुत्व नकली असल्याचा आरोप
काँग्रेसची 96 जागांवरील चर्चा पूर्ण:जागावाटपावर उद्या पुन्हा ठाकरे - पवारांशी चर्चा - पटोले; भाजपचे हिंदुत्व नकली असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा करत काँग्रेसची 96 जागांवरील बोलणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या 96 जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे हिंदू प्रेम नकली आहे, नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि स्वयंभू विश्वगुरु असा प्रचार करण्यात आला. या ११ वर्षात शेतकऱ्यांचा आत्महत्यांमध्ये वाढ झाली त्यात जास्त हिंदूच होते. बेरोजगाराला कंटाळून तरुणांच्या आत्महत्या झाल्या त्यातही जास्त हिंदूच आहेत. भाजपाची सत्ता आली की हिंदूवर अन्याय केला जातो हे लपून राहिले नाही.
भाजपाचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले असे जाहीरपणे सांगायचे व उमेदवारांच्या यादीत औरंगाबाद लिहायचे ही दुतोंडी भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची स्पष्ट भूमिका आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा