घरचा आहेर देणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी
'सच' का सामना : अजित दादांचा धाडसी निर्णय; 'महायुती'ला घरचा आहेर देणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारबाबत एक धक्कादायक विधान केले होते. यावेळी त्यांनी प्रसिध्द केलेल्या एका पत्रकाद्वारे महायुती सरकार 'मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही'असं म्हटलं होतं.
चव्हाण यांचे हे विधान म्हणजे महायुती सरकारला घरचा आहेरच मानला गेला होता.त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कडक भूमिका घेतली आहे.चव्हाण यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
आमदार सतीश चव्हाण यांनी 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे, असे असताना आमदार चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.आमदार सतीश चव्हाणांच्या पत्राची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी चांगलीच दखल घेतली होती.आमदार चव्हाण यांच्यावर दोनच दिवसांत ‘राजकीय’ कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता सतीश चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा