प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर: पक्षाकडून कार्यकर्त्यांना केलं आवाहन
प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर: पक्षाकडून कार्यकर्त्यांना केलं आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रक काढत माहिती दिली. गुरुवारी, ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत वंचितच्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली. ” बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर कुटुंब यावेळी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. त्यामुळे आपणास विनंती आहे की कुटुंबाच्या विनंतीचा आदर करावा कारण ते कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभाग यांच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत”, असंही सांगण्यात आलं आहे.
त्यानंतर आता प्रकाश आंबडेकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी अपडेट दिली आहे. सुजात आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीबाबत मत व्यक्त केले आहे. सुजात आंबेडकर म्हणाले की, "मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे. सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत आहे," असे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा