माधुरी मिसाळ यांना निवडून देणं ही जनतेचीच इच्छा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.पंकजा मुंडे यांनी पर्वती मतदारसंघातून फोडला पुण्यातील प्रचाराचा नारळ
माधुरी मिसाळ यांना निवडून देणं ही जनतेचीच इच्छा
पुणे ।दिनांक ०६।
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पर्वतीमधून माधुरीताई मिसाळ चौथ्यांदा विजयी होणं ही जनतेचीच इच्छा आहे, त्यामुळे त्या विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास आ. पंकजाताईंनी व्यक्त केला तर विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
भाजपा महायुतीच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज देवेंद्र फडणवीस, आ. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फोडण्यात आला, त्याप्रसंगी बिबवेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उमेदवार माधुरीताई मिसाळ, विजय शिवतारे, आ. अमित गोरखे, धीरज घाटे आदींसह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे सभेस संबोधित करताना म्हणाल्या, सभेला मोठ्या संख्येने लोक आले आहेत. हा प्रतिसाद पाहून ज्याच्या सभेला तुम्ही आला आहात त्यांना निवडून देण्याची जनतेची इच्छा दिसून येत आहे. ही प्रचार सभा नसून माधुरीताईंच्या विजयाची सभा आहे. सन २००९ मध्ये माझे तिकिट जाहीर झाले पण माधुरी मिसाळ यांचे तिकीट जाहीर होईपर्यंत लोकनेते मुंडे साहेब आनंदी झाले नव्हते कारण सतीश मिसाळ हे त्यांचे देखील कुटुंब होते. मतदारसंघातील सरकारच्या योजना मी सांगणार नाही पण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी माधुरी मिसाळ यांनी प्रयत्न केले आहे. त्यांचे कोणते काम कधीच अडवले जात नाही. केवळ आमदार होऊन विकास होऊ शकत नाही त्यासाठी राज्यात सत्ता येणे आवश्यक असते. २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप निवडून आला पण थोडक्यात सत्ता गेली आहे. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत, देशात विकासाचा हौद त्यांनी भरला आहे, हा विकास तुमच्यापर्यंत आणायचा असेल राज्यात महायुतीची पाईपलाईन आणावी लागेल, त्यासाठी एकेक आमदार महत्वाचा आहे. माधुरीताईंना विजयी करून पुन्हा एकदा महायुती सत्तेवर आणा असे आवाहन आ. पंकजाताईंनी केले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा