मोहा येथे सर्वाधिक नोटा चा वापर
परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवाराला आठ मतदान केंद्रावर भोपळा !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
संपूर्ण महाराष्ट्रातील बहुचर्चित परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ मुंडे परिवाराचा निर्विवाद बालेकिल्ला असल्याचे मतदानातील आकडेवारीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 'मोठा चमत्कार करणार' असे शरद पवार यांच्या बाबतीत या मतदारसंघातील निवडणुकी संदर्भात म्हटले जायचे. मात्र शरद पवारांच्या पक्षाला परळी मतदारसंघातील मतदान केंद्रावर शून्य मते मिळाली आहेत. तर अनेक ठिकाणी या पक्षाच्या उमेदवाराला दोन आकडी मतेही मिळवता आलेली नाहीत.
धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या राजेसाहेब देशमुख प्रचाराच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि कार्यकर्त्यांचा संच सक्रिय करण्यात त्यांना शेवटपर्यंतही यश आले नाही. त्यामुळे निवडणूक प्रचार काळातच ही निवडणूक संपूर्णतः एकतर्फी होईल असे चित्र झाले. शेवटपर्यंतही शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचार व मतदारसंघातील जनसंपर्कात आपला प्रभाव निर्माण करता आला नाही.या सर्व परिस्थितीचा परिणाम निवडणूक निकालावर स्पष्ट झाला. परळी मतदार संघातील 363 मतदान केंद्रापैकी बहादुरवाडी, भोजनकवाडी, धर्मापुरीचे तीन , कुसळवाडी, जिरेवाडी व भोपळा या 8 मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख यांना 0 मतदान मिळाले आहे तर 47 मतदान केंद्रात त्यांना 9 च्या आतच मतदान पडल्याचे दिसून येत आहे.
8 ठिकाणी शून्य तर 47 ठिकाणी एक आकडी मतदान
या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 1,94,889 एवढी मते घेत तब्बल 1 लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विरोधकांचा सुपडा साफ केला. मतदार संघात असलेल्या 363 मतदान केंद्रापैकी 8 केंद्रावर प्रमुख विरोधक असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना भोपळा देखील फोडता आला नाही तर 47 ठिकाणी एक आकडी मतदानावर समाधान मानण्याची नामुष्की ओढवली.
मोहा येथे सर्वाधिक नोटा चा वापर
परळी मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 97 मोहा येथे सर्वाधिक 21 मतदारांनी नोटा चा वापर केला, त्या पाठोपाठ गिरवली बावणे 13, कासारवाडी 12, बर्दापूर 11, जवळगाव 10, तर पोस्टल मतदान करणाऱ्या 7 मतदारांनी नोटा चा वापर केला.मतदार संघात एकूण 912 मतदारांनी नोटा चा वापर यावेळो मतदार संघात केला.
शून्य मतदान पडलेली मतदान केंद्रे
विधानसभा निवडणूकीत राजेसाहेब देशमुख यांना शून्य मतदान पडलेले मतदान केंद्र: बहादूरवाडी, भोजनकवाडी, धर्मापुरीतील तीन मतदान केंद्र, कुसळवाडी, जिरेवाडीतील एक मतदानकेंद्र, व भोपळा ही आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा