मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या उमेदवाराच्या फायद्याचा?
परळी विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदान: सरासरी एकूण 72 टक्के झालं मतदान
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात आज प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत परळी मतदार संघात विक्रमी मतदान झाले असुन एकूण सरासरी 72 टक्के इतके मतदान झाले आहे.
परळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रक्रियेत आज दि. 20 रोजी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडून उस्फूर्तपणाने मतदान केले. संपूर्ण दिवसभर मतदानाची गती चांगली असल्याचेच दिसून आले. मतदार संघातील व परळी शहरातील सर्वच मतदान केंद्रे मतदारांनी गजबजुन गेल्याचे दिसून आले. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या निवडणूक विभागाच्या अहवालानुसार सरासरी 50 टक्के मतदान पार पडले होते.
दुपारनंतरही हाच ट्रेण्ड सुरू राहिला. मतदान करण्याची वेळ संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही 72 टक्के इतकी झाली. निवडणूक विभाग अंतिम आकडेवारी अचूक करून अधिकृत टक्केवारी जाहीर करणार असल्याने या टक्केवारीत थोडाफार अंशत: हा बदल होऊ शकतो. मात्र सरासरी 72 टक्के एकूण मतदान परळी मतदारसंघात झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात एकूण मतदार संख्या तीन लाख 37 हजार 9 76 इतकी आहे. यामध्ये एक लाख 76 हजार 50 पुरुष मतदार तर एक लाख 61 हजार 922 इतकी महिला मतदारांची संख्या आहे. तसेच अन्य मतदारांची संख्या चार इतकी आहे. एकूण तीन लाख 37 हजार 976 मतदारांपैकी आज झालेल्या मतदानात दोन लाख 43 हजार 425 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांमध्ये एक लाख 28 हजार 560 पुरुष मतदारांनी तर एक लाख 14 हजार 865 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाच्या आकडेवारीवरून सरासरी परळी मतदारसंघात एकूण 72 टक्के इतके मतदान झाले आहे. आज झालेल्या मतदानात पुरुष मतदारांची टक्केवारी 73 टक्के आहे. तर महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी ही 71 टक्के इतकी आहे. एकंदरीतच परळी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर व उत्स्फूर्तपणाने मतदान झाले आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या उमेदवाराच्या फायद्याचा राहील हे मात्र दि. 23 रोजी जाहीर होणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा