धनंजय मुंडेंनी रचला इतिहास !
परळीत 'डीएम'च बाॅस: धनंजय मुंडेंनी रचला इतिहास: एक लाख 40 हजाराचे मताधिक्य घेत सर केला परळीचा बालेकिल्ला !
परळी वैजनाथ,...
संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ, हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या बालेकिल्ल्यात मुंडेंना चोहोबाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजयाने सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवले आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 194889 एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी वैजनाथ मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. सुरुवातीपासूनच या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना चोहोबाजूंनी घेण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या अगदी सुरुवातीला लोकसभेचा अनुभव बघता परळी मतदारसंघाची निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी या वळणावर घेऊन गेल्यास या ठिकाणी धनंजय मुंडेंना रोखणे शक्य होईल असा कयास बांधण्यात आला. त्यामुळे ओबीसी मधील अनेक इच्छुक चेहऱ्यांना डावलत शरद पवारांनी उमेदवारी मराठा चेहरा असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना दिली.
परळी मतदारसंघात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच या उमेदवारीवरून मतदारसंघाची हवा बदलली. परळी मतदार संघाबाहेरचा रहिवासी असलेला उमेदवार दिल्याने या निवडणुकीचा नूर पालटून गेला. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेका विरुद्ध निवडणूक लढवलेले पंकजा मुंडे व त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे यावेळी मात्र राज्यात झालेल्या महायुतीमुळे एकत्र आले होते. मतदारसंघातील तुल्यबळ प्रतिस्पर्धी राहिलेले मुंडे परिवारातील बहिण भाऊ एकत्र असल्याने या मतदारसंघात महाशक्ती एकवटली. याचा निश्चित चांगला परिणाम या निवडणूक निकालातून दिसून येणार अशी सर्वांनाच खात्री होती आणि निवडणूक निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीने हे सिद्धही झाले आहे. धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राजेसाहेब देशमुख प्रचाराच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि कार्यकर्त्यांचा संच सक्रिय करण्यात त्यांना शेवटपर्यंतही यश आले नाही. त्यामुळे निवडणूक प्रचार काळातच ही निवडणूक संपूर्णतः एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले.
शेवटपर्यंतही शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचार व मतदारसंघातील जनसंपर्कात आपला प्रभाव निर्माण करता आला नाही. धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेता, सामाजिक न्याय मंत्री, कृषिमंत्री म्हणून केलेली विकास कामे , मतदार संघासाठी खेचून आणलेला भरीव विकास निधी, मतदार संघातील सर्व मतदारांशी असलेला थेट संपर्क याच्या जोडीला पंकजा मुंडे यांची शक्ती आणि या मतदारसंघात मोठ्या संख्येने भाजपला माणणारा मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला. याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून येत असून या निवडणुकीच्या निकालात धनंजय मुंडे यांना ऐतिहासिक असे एक लाख 40 हजार चे मताधिक्य मिळाले आहे.परळी मतदारसंघाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून विजयी होणारे धनंजय मुंडे हे पहिलेच उमेदवार ठरले आहेत.
• परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत :
1. धनंजय मुंडे - विजयी-194889 (+ 140224)
2. राजेसाहेब देशमुख- 54665
3. साहस आदोडे - 2537
4. डी. एल. उजगरे - 1064
5. दयानंद लांडगे - 816
6. हिदायत सय्यद - 485
7. केदारनाथ जाधव - 340
8. अल्ताफ सय्यद - 248
9. राजेसाहेब देशमुख - 235
10. शाकेर शेख - 180
12. भागवत वैद्य - 143
13. नोटा - 912
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा