परळी मतदारसंघात रंगले "कुर्यात सदा टिंगलम्" !
"अरे,ज्यांच्या नेत्याचेच लग्न झाले नाही ते काय तुमचे लग्न लावणार"- धनंजय मुंडे यांनी उडविले 'त्या' वक्तव्याची खिल्ली
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी घाटनांदुर येथील सभेत तरुण मुलांच्या लग्नाबाबत केलेल्या अजब वक्तव्यानंतर या आश्वासनाची सोशल मीडियातून जोरदार चर्चा होत आहे. यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याचअनुषंगाने राजसाहेब देशमुख यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनीही या वक्तव्याची खिल्ली उडवत ज्यांच्या नेत्यांचीच लग्नं झाले नाहीत ते काय तुमचे लग्न लावून देणार ?अशा शब्दात त्या अजब आश्वासनाचा समाचार घेतला आहे.
घाटनांदुर येथे झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी तरुण मुलांची अविवाहित राहण्याची मोठी संख्या आहे. तुम्हाला लग्नाला मुली मिळत नाहीत. मला आमदार करा तुमचे लग्न लावून देतो अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात कोण काय आश्वासने देईल याचा नेम नाही अशा प्रकारची चर्चा होत आहे. त्याचबरोबर 'भावी आमदार वधू वर सूचक मंडळ' असे म्हणत या वक्तव्याची सोशल मीडियातून मोठी चर्चा होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे 'आपली परिचय पत्रे भावी आमदाराच्या वधू वर सूचक मंडळाला पाठवा', तसेच 'तुमच्या नेत्यांचेच लग्न झाले नाहीत तर तुम्ही आमची काय लग्न लावणार?' अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या अजब आश्वासनावर व्यक्त केल्या जात आहेत. आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणात राजेसाहेब देशमुख यांचा हा लग्नाचा मुद्दा घेत या वक्तव्याची आपल्या स्टाईलने खिल्ली उडवली आहे. एकंदरीतच निवडणूक प्रचारात कोणता मुद्दा कधी चर्चेचा होईल आणि कोणती वक्तव्ये काय मजेशीर प्रसंग निर्माण करतील हे सांगता येत नाही.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोण काय म्हणेल आणि प्रचार करण्यासाठी कोणते आश्वासने देईल हे न बघितलेलेच बरे. प्रचाराच्या भाषणांमधून वाटेल ते बोलणे आणि मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय नेते करत असतात यातून काही मजेशीर प्रसंग ही उद्भवतात. त्याचबरोबर काही वक्तव्यावरून साधक- बाधक चर्चा घडतात, काही विधाने वादग्रस्त ठरतात, सोशल मीडियातून त्यावर ट्रोलिंग केलं जातं अशा वेगवेगळ्या पद्धतीने कोण कोणते वाक्य कोणत्या अर्थाने घेईल हे सांगता येत नाही. असाच एक मजेशीर प्रसंग आता परळी मतदार संघातील शरद पवारांच्या उमेदवाराच्या भाषणातून चर्चेला आला आहे.
परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडुन द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी घाटनांदूर येथे झालेल्या जाहीर सभेत भाषणातून लग्नाचा फंडा वापरला आहे. मतदार संघातील तरुण अविवाहित मुलांना त्यांनी मला निवडून द्या मी तुमची लग्न करुन देतो असे आवाहन केले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा