७५ व्या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना अधिकार दिले - प्रा. अशोक मुंडे
संविधानिक मूल्यांचे संवर्धन करावे - उप-मुख्यअभियंता महेश महाजन
परळी /प्रतिनिधी
संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार दिले असे प्रतिपादन प्रा.अशोक मुंडे यांनी थर्मल कॉलनी येथील प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाशेजारील सम्राट अशोक सभागृहामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित ७५ व्या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे उप-मुख्यअभियंता महेश महाजन हे होते. विचार मंचावर प्रभारी उपमुख्य अभियंता एच. के. अवचार, सहायक कल्याण अधिकारी शरद राठोड, आणि उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र रोडे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांना संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. संविधानातील मौलिक अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना गेवराई येथील प्रा.अशोक मुंडे पुढे म्हणाले कि, भारतातील प्रत्येक नागरिकास मूलभूत अधिकार संविधाच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. पुढे बोलतांना त्यांनी संविधानातील प्रावधान व कलमे समजावून सांगितली. या व्यवस्थेने महिलांना कोणतेही अधिकार दिले नव्हते ते सर्व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मार्फत महिलांना दिले. महिलांना वडिलांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा तसेच लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या संपत्तीतील बरोबरीचा हिस्सा, सार्वजनिक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने वेतन तसेच १२ वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण इत्यादी अनेक अधिकार दिले. लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या दीड हजार रुपयांपेक्षा कितीतरी पटीने चांगले अधिकार संविधानाने दिले आहेत. बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून येण्यासाठी काँग्रेस नेते जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याशी संघर्ष करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल मधून जैसोर खुलना मतदार संघातून जोंगेंद्रनाथ मंडलच्या साह्याने निवडून गेले. संविधान सभेत काँग्रेसला बहुमत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. बाबासाहेबांनी ७५ वर्षांपूर्वी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्याची आज गरज पडत आहे. अश्या अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप करताना उपमुख्य अभियंता महेश महाजन म्हणाले कि, प्रत्येक नागरिकांनी संविधानिक मूल्याचे संवर्धन करून त्यांचे जतन करावे तसेच भारतीय संविधान सर्वानीच अभ्यासले पाहिजे असेही त्यांनी वक्तव्य केले.
कार्यक्रमास मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बी.एल. वडमारे, पतसंस्थेचे चेअरमन बालाजी गित्ते, कामगार नेते हरिराम गित्ते, कार्यकारी अभियंता प्रफुल्ल मगरे, सचिन राऊत, पत्रकार भगवान साकसमुद्रे, मुरलीधर शिंदे, अशोक व्हावळे, संघरक्षित मस्के, शिवाजी होटकर, श्रीकांत इंगळे, महादेव वंजारे, अविनाश आचार्य, विजयानंद बावसकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम झाल्यानंतर उत्सव समितीच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र शिंदे यांनी केले . सूत्रसंचालन धर्मराज मस्के तर उपस्थितांचे आभार कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा