आम्ही दोघे बहीण-भाऊ एकञ; परळीच्या सर्वांगीण विकासासाठी मिळुन काम करु- ना.धनंजय मुंडे
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे परळीत दीपावली स्नेहमिलन ; मुंडे बहीण-भावाची उपस्थिती
राजकारणातील चिखलात 'कमळ' बनुन समर्पित भावनेने काम करतेयं- आ.पंकजा मुंडे
आपल्याला गुलाल उधळायचायं, धनुभाऊंना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे केले आवाहन
आम्ही दोघे बहीण-भाऊ एकञ; परळीच्या सर्वांगीण विकासासाठी मिळुन काम करु- ना.धनंजय मुंडे
परळी वैजनाथ, ।दिनांक १०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा दीपावली स्नेहमिलन सोहळा अतिशय थाटात पार पडला. या सोहळ्यात मुंडे बहीण-भावाने केलेल्या मनमोकळ्या भाषणात नात्यांचा ओलावा दिसून आला. राजकारणातील चिखलात मी 'कमळ' बनुन काम करतेयं असं सांगत आ. पंकजा मुंडे यांनी या निवडणूकीत आपल्याला गुलाल उधळायचा आहे, त्यासाठी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असे आवाहन केले तर आम्ही दोघे बहीण-भाऊ एकञ आहोत, परळीच्या सर्वांगीण विकासासाठी मिळून काम करु असा शब्द उमेदवार धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शहरातील बीकेएस गार्डन येथे पार पडलेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, दत्ताप्पा इटके, जीवराज ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, शांतीलाल जैन, डॉ. हरीश्चंद्र वंगे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैजनाथ जगतकर, अंबाजोगाईचे शामराव आपेट, गणेश कराड, जीवनराव किर्दंत, अविनाश मोरे आदींसह मतदारसंघातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व सरपंच, चेअरमन व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना आ.पंकजा म्हणाल्या की, ‘मी माझ्या आयुष्यात कधीच कोणतेही वाईट काम केले नाही. आमदार झाले, मंत्री झाले आणि पालकमंत्री झाले. या माध्यमातून जिल्ह्यासाठी व परळीसाठी अभूतपूर्व असे काम केले. आयुष्यात सर्व काही मिळाले आहे. आता लोकनेते मुंडे साहेबांची आणि पूर्वजांच्या पुण्याईची शिदोरी गोरगरीब, सर्वसामान्य,गरजू लोकांसाठी खर्च करायची आहे. समाजासाठी समर्पित भावनेने काम करायचे हा निश्चय घेऊन आम्ही काम करत आहोत. जीवनात काही चांगले केले असेल तर ते म्हणजे गोपीनाथगड उभारण्याच काम मी केलं आणि कधीच कोणत्याही वाईट कामात सहभागी झाले नाही याचा मला अभिमान आहे. लोकसभेची निवडणुक लढवली, या निवडणुकीत माझे बंधू धनंजय मुंडे माझ्यासोबत राहिले, त्यांनी माझा प्रचार केला याचा मला मनस्वी आनंद झाला. त्यांचे नेते, कार्यकर्ते देखील माझ्या प्रचारात सहभागी झाले. सर्वांनी सांगितल की, ताई, आम्ही तुमच्यावर नाराज नाहीत, तुम्ही कधीच आमच्या विरोधात आमचे वाईट करण्याच्या हेतूने कोणतीही कृती केलेली नाही. याच कारण म्हणजे राजकारणाच्या चिखलात 'कमळ' बनून काम करायच' ही शिकवण मला मुंडे साहेबांनी दिल्याने हे शक्य झालं असे त्या यावेळी म्हणाल्या.
धनंजय मुंडेंना मताधिक्य द्या
देशाच्या राजकारणात अनेक कुटुंब एकमेकांविरोधात लढत आहेत, अनेक ठिकाणी पातळी सोडून आणि मर्यादा ओलांडून भांडण केली जात आहेत. परंतु आम्ही आजपर्यंत कधीही पातळी सोडून राजकारण केले नसल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्यातल्या अनेक मतदारसंघात युती, आघाडीतील नेते, कार्यकर्ते आपापसात भांडत आहेत परंतु आपल्या मतदारसंघात युतीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करून आपल्याला गुलाल उधळायचा आहे. विरोधातील उमेदवारांची आपल्याशी तुलना होऊ शकत नाही. मतदारसंघात विविध विकास कामे, सामूहिक विवाह सोहळा असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम आपल्या उमेदवाराने आजपर्यंत राबवले आहेत. आणि म्हणून धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित आहे, या विजयात त्यांना अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी तालुका, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण स्तरावर आणि शहरात समन्वयक नेमून एकजुटीने काम करा आणि धनंजय मुंडे यांना विजयी करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
आम्ही एकत्र आलो, याचा आनंद - धनंजय मुंडे
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी मागील काही वर्षातील घडलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्या अनुभवातून आता सर्वांनी मिळून काम करावे लागेल. आपल्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप एकत्र मिळून काम करत आहे. पूर्वीही अनेक वर्ष आपण एकत्र काम केलेले आहे, त्यामुळे आपले जुळायला फार वेळ लागला नाही. एकत्र असताना प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्यांना योग्य न्याय व सन्मान दिला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. राज्यात महायुती साकारली आणि आम्ही दोघे बहीण भाऊ एकत्र आलो. याचा सर्वांनाच आनंद झाला. आम्हालाही झाला. आज एक आहोत, भविष्यातही असेच एक राहू. आज एकत्र येऊन काम करत असताना परळीत दोन आमदार होतील आणि माझ्या विजयात सिंहाचा वाटा पंकजाताईंचा असेल. निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीचे राज्यात सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये आ.पंकजा मुंडे यांना नक्कीच मोठी संधी मिळणार आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी ताईंच्या मंत्रिपदाचे संकेत दिले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा