चौथ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे नांदेडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विमोचन 

चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे मूल्य संवर्धन व्हावे- बाळासाहेब पांडे


नांदेड : दिनांक 14 डिसेंबर प्रतिनिधी

अजिंठा फिल्म सोसायटी व देवगिरी चित्रसाधना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे ४ थे संस्करण होणार असून, या फेस्टिव्हलच्या पोस्टरचे अनावरण नांदेड येथे दिनांक 13 डिसेंबर रोजी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, सचिव ॲड. सौ. वनिता जोशी, क्रिएटिव्ह कोचिंग अकॅडमीचे  संचालक प्रा. रमाकांत जोशी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नांदेड जिल्ह्याचे कार्यवाह प्राचार्य हेमंत इंगळे,  मुक्ताई प्रतिषठानचे सचिव राजेश महाराज देगलूरकर, सुयोग इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. अमन जयेंद्र बरारा , प्राचार्य आबासाहेब कल्याणकर, एन एस बी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, सनतकुमार महाजन, संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख संकेत कुलकर्णी, शहर प्रचार प्रमुख विजय राठोड, संतोष कुलकर्णी, धनंजय पत्की  या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 शहरातील एनएसबी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अजिंठा फिल्मच्या विश्वस्त, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सौ. अनुराधा पत्की यांनी सर्वांचे स्वागत करून देवगिरी चित्रसाधनेचा या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजनामागचा उद्देश आणि भूमिका विशद केली. सदर शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन आणि संरचना कशा प्रकारची असेल याबद्द्लचे विस्तृत निवेदनही  केले.

 "एकीकडे आजकाल मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारे गल्लाभरू दिशाहीन चित्रपट व दुसरीकडे अर्थपूर्ण दर्जेदार सिनेकलाकृती यामधील फरक युवा पिढीला कळण्यासाठी अशा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल चे आयोजन गरजेचे आहे " असे प्रतिपादन याप्रसंगी  प्रा. रमाकांत जोशी यांनी केले. 

" कमीत कमी शब्दात, वेळेत आणि प्रसंगात कमाल परिणाम कसा करावा याचे प्रात्यक्षिक शॉर्ट फील्मद्वारे या क्षेत्रात संधी शोधणाऱ्या कलाकारांना करता येते. आधीच्या तिन्ही फेस्टिव्हल्स मधून अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले हे अत्यंत कौतुकास्पद आहे " असे प्रतिपादन ॲड. वनिता जोशी यांनी केले.

प्राचार्य हेमंत इंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, युवा पिढीला नेमके कोणत्या दिशेने गेले पाहिजे यासाठी हा  शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिशादर्शक आहे. दृकश्राव्य माध्यमाचा समाज मनावर मोठा, दूरगामी परिणाम होत असतो. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बाळासाहेब पांडे म्हणाले की " चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय मूल्ये, संस्कृती आणि विचारांचे संवर्धन व्हावे याकरिता आयोजित होणाऱ्या अशा  फेस्टिव्हल्सचे वारंवार आयोजन होणे गरजेचे आहे. ज्यामधून एक सुसंस्कृत, देशाभिमानी जबाबदार तरुण पिढी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करेल. आपल्या देशापुढील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी व नैतिक मूल्यांची होत असलेली घसरण थांबविण्यासाठी मनोरंजन क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत."यावेळी सनतकुमार महाजन यांनीही आपले विचार व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अनुराधा पत्की यांनी , वीरभद्र स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले. वीरभद्र स्वामी व ईश्वर मचकटवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, कॅम्पस फिल्म या तीन विभागांसह बालचित्रपट या विषयांवर फिल्म मागविण्यात आल्या असून ●पर्यावरण●महिला सशक्तीकरण ●शिक्षण आणि कौशल्य विकास ●सामाजिक समरसता ● कुटुंब (परिवार) ● नागरिक कर्तव्य ●समर्थ भारत या विषयांवर आधारित चित्रपट महोत्सवात सहभागी केले जाणार आहेत. महोत्सवात १ लाखांच्या वर  रोख पारितोषिक व करंडक असे पुरस्काराचे स्वरूप असून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या टिमला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. या दोन दिवसीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांच्या स्क्रिनींगसह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास तसेच, दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, पटकथाकार, तंत्रज्ञ यांच्या मास्टर क्लास (कार्यशाळा) होणार असून सोबतच चित्रपट दिंडी,प्रदर्शनी, टुरिंग टॉकीज यांसारखे अभिनव उपक्रम सुद्धा होणार आहेत. देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल च्या ४थ्या संस्करणात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये, नाट्य, चित्रपट संस्था, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांनी १५ जानेवारी २०२५ पर्यंत आपले चित्रपट पाठवावे असे आवाहन ४थ्या देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक तथा लेखक प्रा.योगेश सोमण तथा संयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार