गुन्हेगार तो गुन्हेगारच :कोणाच्या जीवावर उठण्याएवढा असूरीपणा असू नये

 लोकनेत्याच्या अभिवादनासाठी  गोपीनाथगडावर राज्यभरातून मोठी गर्दी  !

मुंडे साहेबांचे संस्कार व विचार शेवटच्या श्वासापर्यंत संपू देणार नाही - पंकजाताई मुंडे

वंचित मराठवाड्याला न्याय, सुरक्षित लोकजीवन व सर्वांचा विकास हे सूत्र घेऊन राजकारणात काम करणार

खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचे मुंडे साहेबांचे आमच्यावर संस्कार  !

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर व्यक्त केली चिंता : गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न हवा पण जिल्ह्याची बदनामी करु नका


दुःखद घटनांकडे दुःख म्हणून बघा यात राजकारण नको


परळी वैजनाथ, ।दिनांक १२।

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपलं अखंड आयुष्य कमळ रुजविण्यात घातलं आणि शेवटी कमळातच त्यांनी विसावा घेतला. वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देत असताना ज्यांचा कोणी वाली नाही त्यांचा कैवारी होण्याचे काम मुंडे साहेबांनी केलं. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी  सर्वंकष राजकारण केलं, हाच संस्कार व विचार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत  मुंडे साहेबांचे संस्कार व विचार मी संपू देणार नाही असा निर्धार भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर बोलताना व्यक्त केला.

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आज राज्यभरातून मुंडे प्रेमींनी सकाळपासूनच दर्शनाला गर्दी केली होती. यावर्षीचा समारंभ साधेपणाने साजरा  करणार असल्याचे आमदार पंकजाताई मुंडे यांनी जाहीर केले होते तथापि, गोपीनाथ गडावर लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जनसागर उसळला होता.                 दुपारी हेलीकॉप्टरने आगमन होताच आ. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांनी लोकनेत्याच्या समाधीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मातोश्री प्रज्ञाताई  मुंडे,पंकजाताई मुंडे यांचा मुलगा आर्यमन , माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. नमिता मुंदडा, आ.मोनिका राजळे, आ. मनोज कायंदे , माजी आ. भीमराव धोंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आदींसह राज्यभरातून आलेले मान्यवर प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

        लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त समाधी परिसरात भजनी मंडळाच्या पथकाने उत्कृष्ट भजन सादर केले, यात स्वतः पंकजाताई मुंडे, डॉ. प्रीतमताई मुंडे काही काळ  सहभागी झाल्या होत्या.

आयुष्य जनतेसाठी समर्पित

------

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, पालकमंत्री म्हणून पाच वर्ष मी या जिल्ह्याची प्रामाणिक सेवा केली.कधीही जात पात धर्म बघितला नाही.मुंडे साहेबांचे हेच संस्कार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हा तुमचा- माझा -आपल्या सर्वांचा स्वाभिमान असून त्यांचे संस्कार व विचार संपू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. संस्कार, विचार व सर्वांचा विकास या  सूत्रावर वाटचाल करताना आपले आयुष्य जनतेसाठी समर्पित आहे.ही वाटचाल करताना आपण कधीही डगमगणार नाही. "उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही."

मुंडे साहेबांचे संस्कार व विचार शेवटच्या श्वासापर्यंत संपू देणार नाही 

-----------

गेल्या काही दिवसापासून आपली तब्येत व्यवस्थित नाही आजारी असल्याने व डॉक्टरांनी गर्दीत जाऊ नका असं सांगितल्याने आणि सध्या दौरे व कार्यक्रम बंद आहेत परंतु माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करतात आणि न चुकता तीन जून व बारा डिसेंबरला गोपीनाथ गडावर येता. माझा तर जन्म मुंडे साहेबांच्या पोटी झाला असल्याने मी येणार नाही असे होऊ शकत नाही मुंडे साहेबांनी दिलेले ते संस्कार आणि त्यांचे विचार शेवटच्या श्वासापर्यंत संपू देणार नाही.

वंचित मराठवाड्याला न्याय, सुरक्षित लोकजीवन व सर्वांचा विकास हे सूत्र घेऊन राजकारणात काम

----------

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाकडे वाटचाल सुरू असून महाराष्ट्रातही जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेत राज्यभरात सर्व ठिकाणी मी सहभाग घेतल्या आपल्याला जनतेने सत्ता दिली आहे आपल्या मराठवाड्याला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे. बीड जिल्ह्याचे सुरक्षित लोकजीवन व सर्वांचा विकास करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहिला आहे आणि या सरकारच्या माध्यमातूनही एक काम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगार तो गुन्हेगारच :कोणाच्या जीवावर उठण्याएवढा असूरीपणा असू नये

-------------

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पंकजाताई मुंडे यांनी चिंता व्यक्त केली.केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या अतिशय दुर्देवी व संतापजनक घटना आहे.या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यासह संबंधितांना बोलले आहे. त्याचबरोबर परळीतील अमोल विकासराव डुबे यांचे अपहरण करून लूटमार करण्यात आली.या दोन्ही घटनेतील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे .या घटनांबद्दल मी प्रचंड संताप व्यक्त करते.बीड जिल्ह्य़ात अशी गुन्हेगारी चालू देणार नाही. गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न हवा पण जिल्ह्याची बदनामी करु नका.दुःखद घटनांकडे दुःख म्हणून बघा यात राजकारण नको असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले.

  दरम्यान, मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी संध्याकाळपर्यंत रांग लागली होती. यावेळी आयोजित महाप्रसादाचा हजारो लोकांनी लाभ घेतला. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना