बीड:भाजपा सोडलेल्या लक्ष्मण पवारांनी घेतली फडणवीसांची भेट..
बीड( प्रतिनिधी) जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर आरोप करणारे गेवराईचे भाजपकडून दोन टर्म आमदार राहीलेले लक्ष्मण पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली.निवडणूक प्रचारात जिंकल्यावर पून्हा भाजपात जाणार नाही असे ठणकावून सांगणा-या लक्ष्मण पवारांनी थेट मुंबई गाठुन सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. यामुळे पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा मतदार संघात होत आहे.लक्ष्मण पवारांनी भाजपकडून गेवराई विधानसभेची दोन टर्म निवडणूक लढविली होती. २०१४ पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांचा पराभव केला. तर २०१९ झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांचा त्यांनी पराभव केला.
गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या पवारांनी बीडच्या भाजप श्रेष्ठीवर तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोष व्यक्त केला. यामुळे यंदाची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पुन्हा कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यांचा या निवडणुकीत दारूण पराभव तर झालाच शिवाय डिपॉझिट देखील वाचू शकले नाही. त्यानंतर त्यांची राजकीय भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले असतानाचा मंगळवारी लक्ष्मण पवार यांनी थेट मुंबई गाठुन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने मतदाराबरोबरच तालुक्यातील जनता संभ्रमात पडली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर लक्ष्मण पवार यांचे राजकीय पुनर्वसन की अन्य जबाबदारी मिळणार याची उत्सुकता तालुक्यातील जनतेला लागलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा