केवळ पाच दिवसांमुळे शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांवर भरतीत अन्याय
महानिर्मिती तंत्रज्ञ-३ पदाची सरळसेवा भरती मात्र एका जाचक अटिने शेकडो शिकाऊ उमेदवार राहणार वंचित !
केवळ पाच दिवसांमुळे शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांवर भरतीत अन्याय
परळी वैजनाथ,प्रतिनिधी....
महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ तीन या पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सध्या सुरू असून याबाबतची जाहिरातही आलेली आहे. मात्र या जाहिरातीत असलेल्या एका जाचक अटीमुळे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो शिकाऊ उमेदवारांवर या भरती पासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरची तारीख वैध म्हणून गृहीत धरण्यात येणार असल्याने एक वर्षाचे शिकावू (अप्रेंटिसशिप) प्रशिक्षण पूर्ण केलेले परळीतील सव्वाशे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. हा एक प्रकारे अन्याय असून याबाबत महानिर्मितीने तातडीने शुद्धिपत्र काढून या उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने जाहिरात क्र. ०४/२०२४ नुसार महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेतून महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त ८०० पदे भरावयाची आहेत. यामध्ये तंत्रज्ञ-३ रिक्त पदांच्या चार श्रेणीतून भरती करण्यात येणार आहे. 1. सामान्य: महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्तां व्यतिरिक्त उमेदवार 2.प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी:महानिमिती कंपनीचे ०५ वर्षे ते अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार 3.प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी:०१ वर्षे ते ०४ वर्षे कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार 4. बीटीआरआय : महानिमिती कंपनीच्या बीटीआरआय अंतर्गत प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार अशा ८०० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची नियमावली,अटि ,शर्थी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
तंत्रज्ञ-३ या पदाकरीता अर्ज सादर करताना आवश्यक शैक्षणिक अर्हता व उमेदवारांकरीता लागू असलेली सर्व कागदपत्रे / प्रमाणपत्रे व तंत्रज्ञ-३ या पदाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना अर्जात भरलेली माहिती सिध्द करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे / प्रमाणपत्रे, जसे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, कायमस्वरुपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक कार्यमुक्त प्रमाणपत्र, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, आय. टी. आय. / NCTVT / MSCVT/COE उत्तीर्ण प्रमाणपत्र, इत्यादी सर्व जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व दिनांक २५.११.२०२४ रोजी वैध असणे आवश्यक आहे. अशी महत्त्वपूर्ण अट घालण्यात आली आहे.
काय आहे नेमकी जाचक अट...
परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रात महानिर्मितीच्या वतीने अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपलेला आहे. परंतु भरतीच्या जाहिरातीत मात्र प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हे 25 नोव्हेंबर 2024 रोजी वैध असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. वास्तविक पाहता या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण जाहिरातीत दिलेल्या तारखेनंतर केवळ पाच दिवसांनी पूर्ण झालेले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर दिनांक असलेले प्रमाणपत्र ही अप्रेंटिसशिप करणाऱ्या परळीतील 125 शिकाऊ उमेदवारांना मिळणार आहे. परंतु जाहिरातीत 25 नोव्हेंबर हीच तारीख वैध धरल्या जाणार असल्याचे सांगितल्याने हे उमेदवार या भरती प्रक्रियेपासून निश्चितच वंचित राहणार आहेत. हा एक प्रकारे या प्रशिक्षणार्थींवर मोठा अन्याय आहे त्यामुळे ही तारीख प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतरची असणे आवश्यक असतानाही खोडसाळपणाने प्रशिक्षण पूर्ण होण्याआधी पाच दिवसाची तारीख या जाहिरातीत देण्यात आलेली आहे. याबाबत महानिर्मितीने शुद्धिपत्रक काढून हा अन्याय दूर करावा अशी मागणी अप्रेंटिसशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून करण्यात येत आहे.
⏭️ "आम्ही गेल्या एक वर्षापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रात महानिर्मितीच्या अप्रेंटीशीप मध्ये भाग घेतला. एक वर्ष कालावधीही पूर्ण केला. अप्रेंटिसशिप करत असतानाच भरतीची आतुरतेने वाट बघत होतो. अपेक्षेप्रमाणे जाहिरात आली पण आमच्यावर अन्याय करणारी ही जाहिरात आहे. यापूर्वी अप्रेंटीशीप चालू असतानाच्या कालावधीत जरी जाहिरात निघाली तरी ॲपियर म्हणून अर्ज दाखल करता यायचे व कागदपत्र छाननी मध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. यावेळी मात्र आमचे प्रशिक्षण 30 तारखेला पूर्ण झाले जाहिरातीत मात्र 25 नोव्हेंबर तारीख वैध धरण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ही जाचक व भरतीपासून वंचित ठेवणारी अट आहे. शुद्धिपत्रक काढून 25 नोव्हेंबर तारीख वैध ऐवजी 30 नोव्हेंबर करणे आवश्यक आहे.हा आमच्यावर घोर अन्याय आहे. याची दखल महानिर्मितीने घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा."
- कुसुम साखरे
शिकाऊ प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, परळी वैजनाथ.
परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाकडून प्रतिक्रीया देण्यास नकार
दरम्यान, याबाबत परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाशी प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता भरती प्रक्रियेचा विषय आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया महानिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून राबविली जाते. आमच्या केंद्रात अप्रेंटिसशिप करणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करणे हे आमचे काम आहे ते करण्यात आलेले आहे. मात्र भरती प्रक्रियेत आमचा काहीही सहभाग येत नसल्याचे सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा